। पुसद । प्रतिनिधी ।
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील भाजी उत्पादक शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या टोमॅटो आणि वांग्याची दहा रुपये कॅरेटने व्यापार्यांनी हर्राशी केली. हा बेभाव दिसताच शेतकर्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी भाजीपाला व्यापार्याला न विकताच भाजी मंडईत अक्षरशः फेकून दिला आहे.
पुसद शहराच्या सभोवतीला सिंचनाची सुविधा असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकवतात. आरेगाव, निंबी, पार्डी, जांबबाजार, हर्शी, लोहरा इजारा, इंदापूर, आमटी अशा अनेक खेड्यातून दररोज शेतकरी भाजीपाला पुसद येथील भाजी मंडईत आणतात. आधीच्या रात्रीच भाजीपाला स्वच्छ करून सकाळी विक्रीसाठी भाजी मंडईची वाट धरतात. हिवाळ्यात भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळे भाजीपाल्याला चांगले दाम मिळत नाही. भाव गडगडल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. अशातच काही शेतकर्यांनी टोमॅटो आणि वांगी बुधवारी (दि.1) भाजी मंडईत आणले. मात्र, व्यापार्यांनी केवळ 10 रुपये कॅरेटप्रमाणे हर्राशी केली. एका कॅरेटमध्ये साधारणतः 25 किलो टोमॅटो वा वांगी बसतात. त्यामुळे प्रती किलो चाळीस पैसे भाव शेतकर्यांना मिळाला.
टोमॅटो, वांगी तोडण्यासाठी मजुरांना 300 रुपये रोज आहे. त्यात वाहतूक खर्च व उत्पादन खर्च यांचा कुठेही मेळ बसत नाही. एवढ्या कमी भावात शेतातून मंडईत भाजीपाला आणणेही परवडत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले. संतप्त शेतकर्यांनी आपले टोमॅटो, वांगे मंडईत रस्त्यावर फेकून दिले. त्यामुळे काही काळ मंडईतील वातावरण तंग झाले होते.







