। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने येत्या 25 व 26 ऑक्टोबरला विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या निमित्त पहिल्या नवनिर्माण पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केली.
दुष्काळी भागात जलसंवर्धनाचे भरीव कार्य करणारे मानवलोक संस्थेचे अनिकेत लोहिया (अंबेजोगाई) व वैज्ञानिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे युवा कार्यकर्ते शिवाजी माने (जढाळा, लातूर) हे मानकरी ठरले आहेत. 25 हजार रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 26 ऑक्टोबरला सायंकाळी 4.30 वा. हा सोहळा एमआयडीसीतील नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या एस. एम. जोशी विद्यानिकेतनमध्ये होईल. या वेळी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे उद्घाटन (कै.) मोहन खातू क्रीडा संकुल अनावरण या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. 26 ऑक्टोबरला पद्मश्री डॉ. गणेश देवी, पद्मश्री डॉ. झहीर काझी, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, डॉ. प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत सोहळा होईल. हेगशेट्ये यांनी सांगितले, वंचित बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांना, युवकांसाठी प्रेरणादायी आणि प्रज्वलित करणारे अंकूर मनात जागवू शकतील, अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना गौरवण्यात येते. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणार्या मान्यवरांच्या कार्याची ओळख रत्नागिरीकरांना होण्याकरिता संस्थेने विज्ञान, शिक्षण, सामाजिक, साहित्य या चार क्षेत्रांपैकी दरवर्षी दोन क्षेत्रांतील विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती आणि संस्थांना नवनिर्माण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सन्मानमूर्तीअनिकेत लोहिया हे प्रयोगशील व्यक्तीमत्व, शेतकरी, कष्टकरी असून ऊस कामगारांचे प्रश्न मांडताना शेती आणि पाण्याच्या जागृतीकडे अधिक लक्ष देतात. दुष्काळी भागात समाजोपयोगी प्रकल्प राबवून पाणीटंचाईवर मात केली. ज्यांची शेती आणि मातीशी नाळ जोडलेली आहे. अनेक अडचणी, गरिबीवर मात करत शिवाजी माने यांनी कामावरची निष्ठा, प्रामाणिकपणा उराशी बाळगून वाटचाल सुरू ठेवली. विज्ञानाचा ध्यास यातून नवनवीन प्रयोग करत मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण केली. टाकावू वस्तूपासून वैज्ञानिक साहित्य बनवले आहे.