मुंबई | प्रतिनिधी |
मनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू असतानाच शुक्रवारी देशमुख व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेली 4.20 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्या आरोपाच्या आधारे मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबियांची ईडी व सीबीआयमार्फत सध्या चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयने मूळ गुन्हा दाखल केलेला असून, त्याच अनुषंगाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख व कुटुंबियांची 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता शुक्रवारी जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख आणि प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीच्या नावावर आहे. त्यात वरळी येथील 1.54 कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट आणि उरण (रायगड) येथील धुतूम गावातील 2.67 कोटी किंमतीच्या जमिनीचा समावेश आहे. पीएमएलए अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.