उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे विनंती
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राजकीय कार्यक्रम, आंदोलनांमुळं विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे, तसेच महाराष्ट्राला लसींचे जादा डोस द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसर्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली. दरम्यान पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की, ’कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा मुकाबला करत असताना वाढणारी गर्दी कमी करणे हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे यासोबतच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून देशपातळीवर एक धोरण आखण्यात यावे’ अशी विनंती केली आहे.
दरम्यान, देशाच्या जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यापैकी काही राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली असून, राज्यांना कोरोनाशी लढण्याचा कानमंत्रही दिला आहे.