| चिरनेर | प्रतिनिधी |
विवेक जागर संस्थेंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) मुंबई जिल्ह्याच्या वतीने राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम 29 मार्च रोजी दादर (पश्चिम) येथील स्टेशन परिसरात पार पडली.
यावेळी अंनिसचे राज्य पदाधिकारी विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर, रुपेश शोभा, नवी मुंबईचे राजेंद्र पंडित तसेच दादर, दहिसर, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर या शाखांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय आनंद पटवर्धन, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे शरद डीचोलकर आणि विविध सामाजिक संस्था व समविचारी संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, हे प्रकरण केवळ गुन्हेगारी नसून अंधश्रद्धेच्या आडून चालणाऱ्या बुवाबाजीचे गंभीर उदाहरण असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. अशा भोंदू बाबांविरोधात सरकारने तातडीने कारवाई करावी, तसेच जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर, गीते आणि संवादाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, 21व्या शतकातही समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. भीती, तणाव, हव्यास आणि परंपरांचा प्रभाव यामुळे अनेकजण भोंदूंच्या जाळ्यात अडकतात. विशेषतः महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक यांसारखे प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
अंकज्योतिष, फलज्योतिष, वास्तू, मंतरलेले पाणी, अघोरी पूजा अशा गोष्टींमुळे समस्या सुटत नसून त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, असेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. संदेश बालगुडे यांनी ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे उदाहरणांसह सांगत जनजागृती केली. जादूटोणाविरोधी कायद्याबाबत माहिती देताना नंदकिशोर तळाशीलकर यांनी सांगितले की, या कायद्यामुळे अनेक भोंदूंचा पर्दाफाश झाला आहे. हा कायदा सर्व धर्मीयांना लागू असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली.
या मोहिमेला महिलांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, या प्रकरणात सामील असलेल्या इतर आरोपींनाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. पीडितांना मदत व तक्रार नोंदवण्यासाठी अंनिसने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. विजय परब (9869077462), अर्चना सोनवणे (9821522626), यश सूर्यवंशी (9665040818), रुपेश शोभा (9004282663), प्रियांका सवाखंडे (9892516618) तसेच राज्यस्तरीय संपर्कासाठी कृष्णा चांदगुडे (9822630378) आणि महेंद्र दातरांगे (9763292356) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीडितांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन व समुपदेशन दिले जाणार असून, तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही अंनिसकडून सांगण्यात आले.







