कबड्डी स्पर्धेकरीता बंदिस्त क्रीडासंकुल खा.कीर्तिकर यांची घोषणा

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्रात वर्षभर कबड्डीचा खेळ रसिकांना पहाता यावा म्हणून महाराष्ट्रात बंदिस्त क्रीडा संकुल उभारण्याकरीता प्रयत्न करणार. असे उदगार खासदार व राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन किर्तीकर 23 व्या कबड्डी दिन पुरस्कार वितरण प्रसंगी काढले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने ठाणे जिल्हा कबड्डी असो. च्या सहकार्याने कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले होते. ते पुढे असेही म्हणाले की, कॉर्पोरेट कंपन्यांचा सी.आर.एस.फंड हा खेळासाठी वापरण्याकरीता असतो. कबड्डी संघटनांनी हा मिळविण्याकरीता प्रयत्न करावयास हवेत. 70 वी पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे घेण्याकरिता प्रयत्न करू असे राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे म्हणाले. या कार्यक्रमास कबड्डी रसिकांनी व पुरस्कार विजेत्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांचा हिरमोड झाला. यावेळी व्यासपीठावर पाहुण्याकरिता आसन व्यवस्था न करता. ठराविक पाहुण्यांना व्यासपीठावर बोलाहून त्यांचा सत्कार व त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. आकाश शिंदे व हरजितसिंग कौर संधू हे दोन खेळाडू भारतीय संघाच्या सराव शिबिरात असल्याने त्याचा पुरस्कार त्यांच्या पालकांनी स्वीकारला. कृतज्ञता पुरस्कार स्वीकारण्यााठी जेव्हा 92 वर्षाच्या पुण्याच्या मालती दाते व्यासपीठावर आल्या त्यावेळी क्रीडारसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. त्यांच्या बरोबर परभणीच्या मंगल पांडेने देखील हा पुरस्कार स्वीकारला.

यावर्षी सुरू करण्यात आलेला स्व. फिदा कुरेशी ज्येष्ठ प्रशिक्षक पुरस्कार अनिल घाटे, शरद चव्हाण, सुरेश मापुसकर, राजेंद्र महाजन यांनी, तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार म्हणून सुभाष हरचेकार, राजेंद्र काळोखे, सूरज कदम, इक्बाल जमादार यांनी स्विकारला. किरण बोसेकर, रघुनंदन भट, लीला पाटील – कोरगावकर, वनिता पाटील – तांडेल, निलिमा साने(दाते) यांना ज्येष्ठ खेळाडू, तर नयन साडविलकर, पांडुरंग धावडे, मदन चौधरी, बबन होळकर यांना ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून सन्मानित केले गेले. चैताराम पवार, वसंत मांजरेकर, प्रकाश रेडेकर, विश्‍वास शिंदे, शंकर बूढे, रोहिणी अरगडे, शहाजान शेख यांना ज्येष्ठ पंच म्हणून गौरविण्यात आले. स्व. रमेश देवाडिकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता ठरले रतन पाटील, धर्मा सावंत. राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला ठरला तो मुंबई उपनगर जिल्हा. बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन,नांदेड व शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर हे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद मिळविणारे पुरुष व महिला संघ ठरले. खासदार व राज्य कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष गजानन किर्तीकर, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे, उपाध्यक्ष व अर्जुन पुरस्कार शकुंतला खटावकर, ठाणे जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष कृष्णा पाटील, कार्याध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार योगेश पाटील व राम भोईर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याचे सूत्र संचलन किशोर गावडे यांनी करून रसिकांची दाद घेतली. गर्जतो मराठी या वाद्यवृदांने देखील आपल्या सुमधुर आवाजाने व नृत्याने क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केले. कृष्णा पाटील उभयतांनी अतिशय मेहनत घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Exit mobile version