। पनवेल । प्रतिनिधी ।
बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पूर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 16 ऑक्टोबरला दूस-या बोगद्याचे खोदकाम आरपार झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी दिली.
सध्या या मार्गावर युद्धपातळीवर रस्त्याचे बांधकाम सूरु असून जुलै 2025 पर्यंत हे काम पुर्ण करण्याच्या जोरदार हालचाली प्राधिकरणाकडून सूरु आहेत.या दुहेरी बोगद्यामुळे आणि प्रशस्त महामार्गामुळे काही मिनिटांत बदलापूर येथील नागरिकांना पनवेल, उरण जेएनपीटी बंदरामध्ये आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापर्यंत पोहचता येणार आहे.
सिडकोची दक्षिण नवी मुंबई म्हणजेच नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राला (नैना) थेट दिल्लीशी जोडणारा मुंबई-बडोदा या महामार्गामुळे पनवेल नगरीचे अर्थकारण बदलणार आहे. पुढील 9 महिन्यात या रस्त्याचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंबर कसली आहे. सूमारे सव्वा चार किलोमीटर अंतरावर दुहेरी बोगद्याचे काम 60 टक्के पुर्ण झाले आहे. तसेच हा महामार्गाचे शेवटच्या पॅकेज क्रमांक 17 चे सरासरी 45 टक्के काम पुर्ण झाले आहे. यासाठी 1400 कोटी रुपये खर्च केला जात आहे. पावसाळा संपल्यावर पुन्हा एकदा कामाने गती पकडली आहे. दुहेरी बोगदा आरपार करण्याचे काम ठरविलेल्या मुदतीपेक्षा अगोदर पुर्ण झाल्याने प्राधिकरणाच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. पॅकेज 17 हा 9.6 किलोमीटर अंतराचा असून बदलापूरच्या भोज गावापासून ते पनवेलमधील मोरबे गावापर्यंत हा रस्ता बांधला जाणार आहे. यामध्ये 4.39 किलोमीटरचे दुहेरी भोगदे माथेरान डोंगररांगांखालून खोदले आहेत. 13 मीटर उंच आणि 23 मीटर रुंदीच्या या दुहेरी बोगद्यात 8 वेगवेगळ्या मार्गिका असतील.
विरार-अलिबागचे भूसंपादनच रखडलेबडोदा मुंबई महामार्गाचे पॅकेज क्रमांक 17 चे बांधकाम पुढील 9 महिन्यात पुर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सूरु आहेत. मात्र, या पॅकेजनंतर हा महामार्ग विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेला पनवेलच्या मोरबे गावाजवळ जोडला जाणार आहे.