अनुराग ठाकूर निवडणुकीसाठी सज्ज

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

माजी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर हे पुन्हा भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच, त्यांच्याकडून भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या घटनेत करण्यात आलेल्या बदलाला आव्हान देण्यात आले आहे. प्रभारी समितीकडून हा बदल करण्यात आला होता.

भारतीय बॉक्सिंग संघटनेची निवडणूक येत्या 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेश बॉक्सिंग संघटनेकडून अनुराग ठाकूर व राजेश भंडारी यांना प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात अनुराग ठाकूर उतरणार आहेत. भारतीय बॉक्सिंग संघटनेचे आधीचे अध्यक्ष अजय सिंह यांनी निवडणुकीतील मतदार यादीतून अनुराग ठाकूर यांचे नाव काढून टाकले होते. तेव्हा ही निवडणूक 28 मार्च रोजी होणे अपेक्षित होते; मात्र, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. आता ही निवडणूक गुरुवारी (दि.21) होणार आहे. अनुराग ठाकूर यांनी अर्ज भरला असून नव्या घटनेलाही आव्हान दिले आहे. येत्या सोमवारी (दि.18) सुनावणी होणार आहे. परंतु, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून या प्रकरणावर अद्याप मौन बाळगले आहे. सूत्रांकडून सांगण्यात आले की, न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. त्यानंतर आम्ही आमचे पाऊल उचलणार आहोत.

Exit mobile version