। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पुढील वर्षी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाने बुधवारी पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सर्वात महत्वाच्या अशा उत्तरप्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. भाजपने प्रधान यांच्यासह 8 केंद्रीय मंत्र्यांना यूपीमध्ये तैनात केले आहे. तर, पंजाबची जबाबदारी कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना देण्यात आली आहे.
भाजपने प्रधान यांना उत्तर प्रदेशात प्रभारी केले आहे, तर अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, सरोज पांडे, शोभा करंदजले, कॅप्टन अभिमन्यू,अन्नपूर्णा देवी आणि विवेक ठाकूर यांना सह-प्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबमध्ये शेखावत महत्त्वाची जबाबदारी घेतील आणि त्यांच्यासोबत हरदीप पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा असतील. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उत्तराखंडचे मुख्य प्रभारी असतील. लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आरपी सिंह असतील. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्यात आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मणिपूरमध्ये प्रभारी असतील. निवडणूक आयोग मार्च ते एप्रिल 2022 दरम्यान विधानसभा निवडणुका घेऊ शकतो. 2017 मध्ये भाजपने हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये विजय मिळवला होता. काँग्रेसने पंजाब मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले. पंजाबमध्ये पक्षातील अंतर्गत कलहामुळे काँग्रेस अडचणीत आहे. कृषी कायद्यांमुळे भाजपला पंजाबमध्ये विरोधाला सामोरे जावे लागत आहे.