सरळसेवा भरती अंतर्गत 13 उमेदवारांची निवड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागात मनुष्यबळाचा प्रश्न कायमच आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण भागात सेवा देताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता मात्र जिल्ह्यातील आरोग्य सेवेबाबत आशावादी चित्र समोर येण्याची शक्यता आहे. सरळसेवा भरती अंतर्गत 13 जणांची निवड करण्यात आली असून, या आरोग्य सेवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
सरळसेवा भरती सन 2023-24 अंतर्गत जिल्हा निवड मंडळाने मंजुरी दिलेल्या आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के व आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के संवर्गातील अतिरिक्त अंतिम निवडसूचीमधून एकूण 13 उमदेवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. वैभव डोंगरे यांना उपकेंद्र मजगाव-माणगाव, श्रीकृष्णा वाईकर यांना उपकेंद्र हमरापूर-पेण, विनय कदम यांना उपकेंद्र वेळास-श्रीवर्धन, प्रशांत दुधमल यांना उपकेंद्र वेळास-श्रीवर्धन, सागर वेहेळे यांना उपकेंद्र चौक-खालापूर, अनंता वायाळ उपकेंद्र निजामपूर-महाड, अजयसिंह सावंत भोसले यांना उपकेंद्र दासगाव-महाड येथे नियुक्त करण्यात आले आहे. साकिब पटेल यांना उपकेंद्र आचळोली-महाड, किरण किर्तने यांना उपकेंद्र मोठे शहापूर-अलिबाग, जगदीश सुलाने यांना उपकेंद्र खारआंबोली-मुरूड, प्रकाश शिंदे यांना उपकेंद्र मांघरुण-महाड, अमोल जाधव यांना उपकेंद्र नेवरुळ-म्हसळा, राजेंद्र जोनवाल यांना उपकेंद्र वेळास-श्रीवर्धन येथे नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व 13 उमेदवारांना नियुक्ती आदेश पत्र रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते सोमवारी देण्यात आले. तसेच सर्व नियुक्त उमेदवारांचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
