594 कोटीच्या वार्षिक आराखड्याला मंजूरी

शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन; पालकमंत्री भरत गोगावले यांची माहिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याच्या2026-2027च्या 594 कोटी रुपयांच्या वार्षिक विकास आराखड्याला मंजूरी मिळाली आहे. त्यामध्ये 517 कोटी सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनासाठी 28 कोटी आणि आदिवासी उपयोजनासाठी 49.66 कोटी रुपयांचा समावेश आहे. या अंतर्गत विकास कामांना गती देण्यात आली असून शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली.

जिल्हा नियोजनाची आढावा बैठक सोमवारी (दि.19) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच जिल्ह्यातील वेगवेगळया विभागातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा विकास आराखडा 2025-26 जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेसाठी 481 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनासाठी 28 कोटी आणि आदिवासी उपयोजना करिता 45.3 कोटी असे एकूण 554.3 कोटी रुपयांचा होता. हा सर्व निधी शंभर टक्के वितरीत करण्यात आला असून, सप्टेंबरपर्यंत 87.45 टक्के निधी खर्च झाला आहे. हा सर्व निधी खर्च करण्याबाबत जिल्हा परिषद यंत्रणांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत. निधी संपूर्णपणे खर्च करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा नियोजन कार्यालयाकडून देण्यात आली. राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारने सुमारे 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. जिल्हा स्तरावरील संबंधित यंत्रणांमार्फत विविध शासकीय योजनाअंतर्गत टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी योग्य व नियमीत पाणी पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. ग्रामीण भागातील पशुधनासाठी पुरेसे पाणी चारा, उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणारी गुंतवणूक व रोजगार टीकविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रालालाही आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सर्व घटकांच्या गरजांचा समतोल राखून टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याची माहिती पालकमंत्री गोगावले यांनी दिली.

Exit mobile version