कचर्‍याकडे आराठी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा ओला व सुका कचरा गटारांमध्ये फेकत असल्याने त्या ठिकाणी कचर्‍याचे ढीग पाहायला मिळत आहेत.
श्रीवर्धन दिघी मार्गावरती आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाच ते सहा इमारती नव्याने झालेल्या आहेत व या इमारतीमध्ये अनेक रहिवासी रहायला देखील आलेले आहेत. परंतु आराठी ग्रामपंचायत सदर रहिवाशांचा कचरा उचलण्यासाठी घंटागाडी त्याठिकाणी पाठवत नाही. त्यामुळे येथील रहिवासी कचरा रस्त्यावर फेकत आहेत. सदर कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे गोखले महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. तरी श्रीवर्धनच्या गटविकास अधिकार्‍यांनी आराठी ग्रामपंचायतीला सदरचा कचरा तातडीने उचलण्याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Exit mobile version