पाचव्या दिवशी ही ग्रामस्थांना पाणी नाही
। पेण । मुस्कान खान ।
आंबिवली ग्रामपंचायतीमध्ये सरपंच या आदिवासी समाजाच्या असल्याने या आदिवासी महिलांना कमी लेखून उपसरपंच मनमानी कारभार करीत आहे. पाच दिवस झाले तरी आंबिवली ग्रामस्थांना पाण्याची सोय करुन देत नाही. अखेर पाणी का मिळत नाही म्हणून पुन्हा एकदा महिला ग्रामपंचायतीमध्ये विचारायला गेल्या असता पहिल्यांदा पाणीपट्टी भरा नंतरच पाणी पुरवठा केला जाईल, असे उद्धट उत्तर ग्रामसेवकांकडून देण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे गावातील नगरिकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी ही 31 मार्चपर्यंत भरणे बंधनकारक असते. 31 मार्चनंतर पाणीपट्टी न भरल्यास दंडात्मक कारवाई होते. जर 31 मार्चपर्यंत नागरिकांजवळ शासन नियमानुसार घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याची मुभा असेल तर, ग्रामसेविका पाण्याविना कोणत्या अधिकाराने गावातील नागरिकांना वेठीस धरीत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सत्तेच्या जीवावर मनमानी करुन आणि सत्ताधार्यांच्या सांगण्यावरून ग्रामसेविका देखील ग्रामस्थांना पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे. भाजप उपसरपंच जगदीश पाटील हे देखील उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. एकंदरीत एकीकडे भाजप सरकार लाडकी बहिण योजनेचं श्रेय घेउन टिमकी वाजवत असतानाच आंबिवलीसारख्या गावात भाजपचा उपसरपंच लाडक्या बहिणींना पाण्याविना वणवण करायला लावत आहे. ही भाजपची दुतोंडी भुमिका सर्वसामान्यांना पटण्यासारखी नाही. येत्या निवडणुकीत त्याचा हिशोब ग्रामस्थ केल्याशिवाय राहणार नाहीत, असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामसेविकेला समज देतो- प्रसाद म्हात्रे
आंबिवली ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा संदर्भात ग्रामसेविकेने केलेल्या वक्तव्याबाबत विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जर ग्रामसेविकेने पाणीपट्टी भरा, तरच पाणी देऊ असे वक्तव्य केले असेल तर ते चुकीचे आहे. त्याबाबत त्यांना रितसर समज देउ.
…असे वक्तव्य मी केले नाही-स्मिता घांगुर्डे
नियमबाहय पाणीपट्टी भरण्याबाबत व पाणी न देण्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात ग्रामसेविका स्मिता घांगुर्डे यांच्याशी संपर्क केला असता, महिन्याला पाणीपट्टी भरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शासन निर्णय आहे का? असे विचारताच त्यावर त्यांनी नाही म्हणून सांगून ग्रामसभेचा ठराव असल्याचे सांगितले. तसेच पाणी देणार नाही, असे वक्तव्य केले नाही. गोंधळामध्ये कोणी वक्तव्य केले याकडे लक्ष नव्हते. पाणी देणे गरजेचे आहे; परंतू मी लोकप्रतिनिधींच्या विरुध्द बोलू शकत नाही.