कामकाजाच्या वेळेत कार्यालयात शुकशुकाट
| पाली | वार्ताहर |
सुधागड भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचार्यांची मनमानी समोर आली आहे. उपअधीक्षकांच्या गैरहजेरीत कामकाजाच्या वेळेत कार्यालयात कर्मचारी नसल्याने शुकशुकाट दिसून आला. भरदुपारी एक वाजण्याच्या सुमारास पंखे मात्र रिकाम्या खुर्च्यांना हवा देत असल्याचे चित्र दिसून आले. कार्यालयात एकही कर्मचारी हजर नसल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा मोठा खोळंबा झाला.
सरकारी कर्मचार्यांच्या ऑफिसची वेळ ही 9 ते 5.30 अशी आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी किमान 9.15 पर्यंत ऑफिसात येणे अपेक्षित असते. पण, अनेक कर्मचारी अपेक्षित वेळेत ऑफिसात येत नाहीत, हे येथील कर्मचार्यांवरुन दिसून येत आहे. याबाबत सुधागड पालीचे उपअधीक्षक भूमीअभिलेख साजीद युसूफ शेख यांना याबाबत भ्रमणध्वनीवरुन विचारले असता त्यांनी शासकीय कामानिमित्त मंत्रालयात असल्याचे सांगितले. म्हणजे, वरिष्ठांच्या गैरहजेरीत कर्मचार्यांचा ‘हम करेसो’ कारभार समोर आला आहे. अशा कर्मचार्यांवर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे येथील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. या कार्यालयात दलालांमार्फत काम तात्काळ होत असल्याचे आरोप तेथे उपस्थित असणार्या शेतकर्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले. या मुजोर कर्मचार्यांवर तात्काळ कारवाईची मागणी शेतकर्यांनी केली आहे.







