माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी

स्थानिक महिलांना रिक्षातून उतरवले; दोन प्रवाशांकडून तीन जणांचे भाडे वसूल

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये तब्बल 12 वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने सुरू झालेली पर्यावरणपूरक ई-रिक्षा सेवा आता काही चालकांच्या मनमानीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी सुरू झालेल्या या सेवेतच स्थानिक महिलांना अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर या सेवेचा फायदा नेमका कोणाला? असा सवाल उपस्थित होत आहे. दस्तुरी नाका येथे दोन स्थानिक महिलांना ई-रिक्षातून सामानासह खाली उतरवण्याचा प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्या रिक्षातून प्रवास करताना दोन प्रवाशांना तीन जणांचे पूर्ण भाडे द्यावे लागल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची माथेरान श्रमिक रिक्षा संघटनेनेही गंभीर दखल घेतली आहे.

माथेरानच्या रहिवासी हेमा सावंत आणि वनिता डिगे या दोघी रविवारी सायंकाळी दस्तुरी रिक्षा स्टँडवरून वन ट्री हिल येथे जाण्यासाठी ई-रिक्षात बसल्या. त्यांचा नंबर आल्यानंतर त्या रिक्षा क्रमांक दोनमध्ये बसल्या. मात्र, संबंधित रिक्षाचालक कन्हैया यांनी त्यांना रिक्षातून उतरण्यास सांगितले. ‌‘ही रिक्षा तिकडे जाणार नाही, त्या खडबडीत रस्त्यावरून कोण जाणार?‌’ असे सांगत चालकाने अरेरावी सुरू केली. महिलांनी नियमानुसार प्रवास करण्याचा आपला हक्क असल्याचे सांगूनही चालकाने त्यांचे सामान रिक्षातून बाहेर काढून खाली ठेवले. या अपमानास्पद वागणुकीमुळे दोन्ही महिला व्यथित झाल्या.

त्यानंतर रिक्षा संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी दुसरी ई-रिक्षा उपलब्ध करून दिली. मात्र, तिथेही त्यांची अडवणूक झाली. माथेरानमध्ये आरटीओच्या नियमानुसार दस्तुरी ते हुतात्मा स्मारक आणि दस्तुरी ते छत्रपती शिवाजी महाराज रोड या मार्गांवर ई-रिक्षा चालवण्यास परवानगी आहे. एका वेळी तीनपेक्षा अधिक प्रवासी नेण्यास बंदी आहे. मात्र, पोलीस आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना ‌‘चौथी सीट‌’ म्हणून नेले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत या महिलांनी आपल्यासोबतही तिसरा प्रवासी घ्यावा, अशी मागणी केली. मात्र, रिक्षासाठी अन्य प्रवासी उपलब्ध असतानाही त्यांना तिसरा प्रवासी देण्यात आला नाही. परिणामी, दोन महिलांना तीन प्रवाशांचे पूर्ण भाडे देऊन प्रवास करावा लागला. याबाबत त्यांनी माथेरान श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

माथेरानकरांनी ई-रिक्षा सेवा सुरू व्हावी यासाठी एकजुटीने प्रयत्न केले. मात्र, आज त्याच सेवेत स्थानिक नागरिकांना अशी वागणूक मिळत असेल, तर ही अत्यंत खेदजनक बाब आहे. वनिता डिगे आणि हेमा सावंत यांच्यासोबत दस्तुरी रिक्षा स्टँडवर घडलेला प्रकार निषेधार्ह आहे. वन ट्री हिल येथे जाण्यासाठी रिक्षात बसल्यानंतर कन्हैया नावाच्या चालकाने उद्धटपणे त्यांना सामानासह खाली उतरवले. त्यानंतर दुसरी रिक्षा घेताना दोन प्रवासी असूनही पूर्ण रिक्षाचे भाडे देण्याची वेळ त्यांच्यावर आली. रिक्षामध्ये जागा उपलब्ध असताना एका सीटवरून जाण्यास नकार का देण्यात आला? स्थानिक नागरिकांच्या हक्काची पायमल्ली होता कामा नये.

सीताराम कुंभार,
विरोधी पक्षनेते, माथेरान नगरपरिषद

कन्हैया खेर हे स्वतःचेच नियम बनवत असल्याचा माझाही अनुभव आहे. एकदा मला आणि माझ्या आईला घरी सोडण्यासाठी त्यांनी दीडशे रुपये घेतले होते. याबाबत विचारणा केली असता, रिक्षा स्टँडच्या पुढे रिक्षा न्यायची असल्यास नियमानुसार तेवढेच भाडे होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, असा कोणता नियम आहे, हे मला माहीत नाही. आजारी आणि वयोवृद्ध व्यक्तींना रिक्षा संघटना नेहमीच सहकार्य करते. अगदी रात्री-अपरात्रीही रिक्षाचालक मदतीसाठी तत्पर असतात. मात्र, काही चालकांनी स्वतःचेच नियम बनवून मनमानी करणे थांबवले पाहिजे.

स्मिता गायकवाड,
स्थानिक नागरिक

वन ट्री हिल परिसरातील खराब रस्त्यांमुळे रिक्षा आणताना चालकांना अडचणी येतात, याची आम्हाला जाणीव आहे. या परिसरात दोन शाळा असून, लहान मुलांचीही ये-जा सुरू असते. त्यामुळे प्राधान्याने या रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक वेळी रस्त्याचे काम सुरू झाले की ते बंद पाडले जाते. नगराध्यक्ष, नगरसेवक आणि संपूर्ण गावही याबाबत हतबल होऊन शांत बसते, हे संतापजनक आहे. रस्ते दुरुस्त झालेच पाहिजेत; पण तोपर्यंत स्थानिक नागरिकांना रिक्षा सेवा नाकारली जाता कामा नये. प्रथम गावकऱ्यांना रिक्षा मिळालीच पाहिजे.

कल्पना पाटील,
माजी मुख्याध्यापिका, वन ट्री हिल रहिवासी
Exit mobile version