| अलिबाग | प्रतिनिधी |
आचारसंहितेच्या कालावधीत कामांना मुदतवाढ देऊन पुन्हा निविदा काढण्यात यावी, असा ठराव ग्रामसभेत असतानाही कुरुळच्या ग्रामसेवकांनी आचारसंहितेच्या काळात जिल्हा परिषद काम वाटप समितीकडे प्रस्ताव पाठविला. प्रशासक रजेवर असताना त्यांची मान्यता न घेता हा प्रकार करून 24 लाख रुपयांच्या कामांतील निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिजीत घाडगेसह अन्य ग्रामस्थांनी त्यांचा मनमानी कारभार उघडकीस आणून त्यांचा अपहार करण्याचा डाव हाणून पाडला.
अभिजीत घाडगे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरुळ ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे.ग्रामविकास अधिकारी म्हणून विष्णू वानखेडे असून प्रशासक म्हणून बाळासाहेब येडके कार्यरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासकीय राजवटीतून हा कारभार चालत आहे. नुकतीच नगरपरिषदेची निवडणूक झाली. यावेळी नगरपरिषदेच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातही आचारसंहिता लागू करण्यात आली होती. दरम्यान, कुरुळ ग्रामपंचायतीमधील ग्रामनिधी व 15 वित्त आयोगातील 24 लाख 22 हजार 216 रुपयांची विकासकामे मंजूर करण्याचा प्रयत्न ग्रामसेवक वानखेडे व प्रशासक येडके यांनी केला. ही बाब निदर्शनास येताच 23 डिसेंबरला झालेल्या ग्रामसभेत आचारसंहितेत मुदतवाढ करून पुन्हा निविदा काढण्यात याव्यात, असा ठराव घेण्यात आला. 25 डिसेंबर 2025 ते दोन जानेवारी 2026 या कालावधीत प्रशासक येडके हे रजेवर गेले. दरम्यान वानखेडे यांनी आधीचा कार्यारंभ आदेश रद्द करून ग्रामपंचायतीमधून स्वतःच्या सहीने पंचायत समिती अलिबागकडे कामे वाटपाचा प्रस्ताव पाठवून जिल्हा परिषद कामे वाटप समितीकडून प्रस्ताव मंजूर करून घेतला.
ग्रामसेवक अडचणीत
प्रशासक येडके रजेवर असताना ग्रामसेवक वाखेडे यांनी कामे वाटपाचा प्रस्ताव पाठविल्याने ग्रामस्थांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यामुळे ग्रामसेवकाच्या अधिकारात नसताना, प्रशासकाची मान्यता न घेता हा गैरप्रकार करून मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अभिजीत घाडगे यांच्यासह अनेकांनी केला आहे. तसेच ग्रामस्थांनी ही बाब पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.
मुदतवाढ देऊन कामांची निविदा पुन्हा नव्याने काढण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर कामे वाटपाचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. त्यानुसार ग्रामसेवकांनी पाठविला आहे. दरम्यान रजेवर असल्याने सही घेऊन मान्यता घेण्यात आली नाही.
– बाळासाहेब येडके,
प्रशासक
कुरुळ ग्रामपंचायतीमधील कामे वाटपाचा प्रस्ताव ग्रामसेवकांनी पाठविला. त्यानंतर तो प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार हा प्रस्ताव पाठविताना नियमांचे पालन केले का, याची खात्री केली जाईल. त्यात ग्रामसेवक व प्रशासक दोषी असल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.
-शर्मिला पाटील,
गटविकास अधिकारी, अलिबाग
आचारसंहितेमुळे ग्रामसभेत 24 लाख रुपयांच्या विकासकामांना मुदतवाढ देऊन पुन्हा निविदा देण्यात याव्यात, असा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता. तरी देखील ग्रामसेवक वानखेडे यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदाराला कामे देण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामसेवक व प्रशासक यांनी नियमबाह्य कामे केली आहेत. तरी या कामांना स्थगिती देऊन पुन्हा निविदा मागविण्यात याव्यात.
–अभिजीत घाडगे,
ग्रामस्थ







