आदिवासींचा जुना डांबरी रस्ता खोदला
सरकारी अधिकारी अनभिज्ञ
रस्त्याचे अंतर वाढणार
ग्रामस्थ पोलीस तक्रार करण्याचे तयारीत
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव येथील रस्त्याचे काम शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर आहे. या रस्त्यात आपली जमीन गेली आहे आणि ती जमीन मोकळी व्हावी यासाठी वांगणी गावातील काही लोकांनी रविवारी तेथील जुना डांबरी रस्ताच खोदला आहे. दरम्यान, त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून जुना रस्ता गायब करणार्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी या रस्त्याचे काम ज्या योजनेतून होत आहे, त्या योजनेचे अधिकारी हे देखील जुना रस्ता गायब झाला? याबद्दल अनभिज्ञ आहेत.
सोमवारी 7 मार्च रोजी सकाळी बेडीसगाव ग्रामस्थांना गावातून बाहेर पडताना रस्त्याचा 300 मीटर लांबीचा भाग गायब झाला असल्याची माहिती मिळाली. गावाकडे जाणारा 300 मीटरचा रस्ता गायब झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांनी 15 वर्षपूर्वी रस्ता तयार करण्यासाठी अनेक शेतकर्यांनी आपल्या जमिनीतून रस्ता करण्यास परवानगी दिली होती. मात्र आता वांगणी गावातील स्थानिक व्यक्तीने थेट जेसीबी मशीन लावून रस्ताच उखडवून टाकला आणि रस्ता गायब केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 76 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र आता जुना रस्ताच नामशेष झाल्याने नवीन रस्ता कुठून करणार आणि तोपर्यंत स्थानिकांनी रस्त्याअभावी गैरसोय होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक बेडीसगावच्या सात वाड्यांमधील आदिवासी लोकांनी नेरळ पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला जुना रस्ता शासनाने तयार करून घ्यावा आणि त्याच जुन्या रस्त्यावर मंजुर निधीमधून खडीकरण तसेच डांबरीकरण केले पाहिजे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. तर रस्ता खोदल्याने आम्ही घरातून बाहेर पडू शकत नाहीत, आमचे घराबाहेर पडणे वांगणी गावातील लोकांनी रस्ता खोदल्याने बंद झाले आहे अशी तक्रार चंदर वाघ या शेतकर्याने केली आहे.
जुना डांबरी रस्ताच गायब झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता राहुल चौरे यांनी तात्काळ बेडीसगाव गाठले. घटनास्थळी जाऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामाची माहिती घेण्यात आली असून आपण याबाबत अहवाल शासनाला काळविणार अशी भूमिका उपअभियंता चौरे यांनी सांगितले.
आमची जुना रस्ता हा स्थानिक शेतकर्यांनी जमिनी दिल्यामुळे रस्ता तयार झाला होता. आता तो रस्ता गायब झाल्याने शेतीमधील पाणी पावसाळ्यात कुठे जाणार? ही भीती आम्हा सर्व शेतकर्यांना असून आमचा जुनाच रस्ता तयार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे.
– मंगळ दरवडा, ग्रामपंचायत सदस्य
जागेवर पाहणी केली असून स्थानिक शेतकरी यांनी सदर रस्त्याचा खोदलेला 120 मीटर लांबीचा भाग स्वतः बनवून देण्याची तयारी दर्शविली आहे.त्यात रस्ता खोदून काढल्याने केलेल्या कामाबद्दल आपण वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करणार आहोत.
– राहुल चौरे, उपअभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना