। अलिबाग । शहर वार्ताहर ।
आर्मी ही देशसेवा आहे. फक्त नोकरी किंवा करियरचा एक पर्याय नाही, असे प्रतिपादन सेवानिवृत्त कॅप्टन उमेश वाणी यांनी केले आहे. नेहरू युवा केंद्र, रायगड-अलिबाग तथा ओएसिस : बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग-रायगड-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेस ग्रुपग्रामपंचायत भोईघर यांच्या सहकार्याने राष्ट्रसेवार्थ या युवा विकास तथा उद्धबोधन कार्यक्रमाअंतर्गत लष्कर भरती मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोईघर सरपंच काशिनाथ वाघमारे, नेहरू युवा केंद्र, रायगडचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, ओएसिसचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक कोळी, सहसचिव यज्ञेश पाटील, सदस्य राज घरत उपस्थित होते.
याप्रसंगी उमेश वाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय लष्कर सेवेबाबत संपूर्ण माहिती दिल्यानंतर भारत मातेची सेवा करण्यासाठी भारतीय लष्करात रूजू होण्याचे आवाहन केले. तर निशांत रौतेला यांनी आपल्या ध्येयावर एकाग्र होत सातत्याने यशस्वी होण्याची सूचना केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती कासार, प्रास्तविक यज्ञेश पाटील तर आभारप्रदर्शन प्रतीक कोळी यांनी केले. तर सिद्धेश कासार, रंजित सातामकर, प्रियेशा लाड, रंजना राय या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.