आवक वाढताच भाजीपाला स्वस्त

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी वाढलेल्या किमतीत घट झाली आहे. जवळपास सर्वच्या भाज्यांचे घाऊक दर 10 ते 20 रुपयांनी कमी झाले आहेत. दिवाळीच्या आधी परतीच्या पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाल्याने दरात वाढ झाली होती. मात्र आता आवक वाढल्याने दर घसरले आहेत. महिन्याभरापूर्वी 60 रुपयांना मिळणारी कोंथिबीरची जुडी आता 15 ते 20 रुपयांवर आली आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे आदी भागातून तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरातमधील अहमदाबाद येथून एपीएमसीत भाजीपाल्याची मोठी आवक होते. यात नाशिकच्या टोमॅटोला नेहमीच मागणी असते. सध्या फ्लॉवर, वालाच्या शेंगा, कोबी, वांगी, भेंडी, दोडके, दुधी भोपळा, गवार आदी फळभाज्या व पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत.
सध्या एपीएमसीत दररोज 500 ते 550 गाड्यांची आवक होत आहे. टोमॅटोचे दरही आवाक्यात आल्याने गृहिणींमधून समाधान व्यक्त होत आहे.

भाज्यांची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. आता भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण असल्यामुळे दररोज ताजा भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. थंडी वाढताच भाज्या आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

शंकर पिंगळे, व्यापारी
Exit mobile version