आरोग्य किट, मानधन न मिळाल्याने नाराजी
| रायगड | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन ड्युटीवर नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. जिल्ह्यात शनिवारी (दि.7) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदान बूथवर आशा सेविकांना आरोग्य किट उपलब्ध करून देण्यात आले नाही. तसेच, योग्य मानधन देखील देण्यात आले नसल्याचा आरोप संबंधित सेविकांनी केला आहे. या प्रकारामुळे आशा सेविकांची फरफट होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली. यावेळी जिल्ह्यातील मतदान बुथवर आशा सेविकांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही मतदान बुथवरील आशा सेविकांकडून आरोपांचा फेऱ्या झडताना दिसल्या. सकाळच्या सुमारास काही मतदान बूथवर आशा सेविकांसाठी आरोग्य किट उपलब्ध झाले नव्हते. काही ठिकाणी त्यांचे नाव आणि पद नोंदवलेले नव्हते; तसेच, इलेक्शन ड्युटीवर असूनही मानधन नाही, अशी तक्रारी नोंदवल्या गेल्या. दिवसभर बूथवर उपस्थित राहूनही कोणतीही स्पष्ट सूचना किंवा आर्थिक मोबदला मिळाला नसल्यामुळे सेविकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. काही सेविकांनी सांगितले की, आमच्या समोर इतरांना मानधन वाटप झाले; मात्र, आम्हाला काहीच मिळाले नाही. आम्ही दिवसभर फक्त बसून राहायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवडणुकीसारख्या जबाबदारीच्या कामात आरोग्य सेविकांची नियुक्ती केली जाते; मात्र त्यांना आवश्यक साहित्य व मानधन न मिळाल्यास कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे आशा सेविकांची फरफट होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या तक्रारींची दखल घेऊन तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि सर्वांना नियमानुसार मानधन व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने स्पष्टता देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
