| चिरनेर | प्रतिनिधी |
नाट्य अभिनय माझा छंद आहेच, परंतु अष्टगंध कलामंचाने मला सदैव प्रेरणा दिली. यातून अष्टगंध कलामंचाचा अध्यक्ष या नात्याने निश्चितच कलामंचाच्या नाट्य प्रवासाची ध्येय गाठण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन, असे भावनिक उद्गार अष्टगंध कला मंचाचे अध्यक्ष तथा रंगकर्मी अशोक म्हात्रे यांनी काढले. अष्टगंध कलामंचाच्या वतीने बेलपाडा (उरण) येथे रंगकर्मी अशोक कान्हा म्हात्रे यांचा रविवार (दि.15) रोजी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. तर याप्रसंगी नाटककार हसूराम पाटील, नाटककार धनेश्वर म्हात्रे, रंगकर्मी कृष्णकांत म्हात्रे, रंगकर्मी अशोक म्हात्रे, रंगकर्मी गुरुनाथ गायकर, रंगकर्मी जयकिसन मोकल, रंगकर्मी प्रज्योत पाटील तसेच अन्य कलाकार उपस्थित होते.
यावेळी नाटककार हसूराम पाटील यांनी अशोक म्हात्रे हे खरोखरच नशीबवान आहेत. प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करीत आज ते या टप्प्यावर आले आहेत. त्यांच्याकडे आता मोठ्या ताकदीचं बळ आलं आहे. त्यांच्या परिवाराच्या रूपाने त्यांना प्रेरणा मिळत आहेत. त्यामुळे अभिमान वाटावा, अशी अष्टगंध कलामंचाच्या नाट्यप्रवासात त्यांनी उंच भरारी घेतली आहे. अशा शब्दातून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर नाटककार धनेश्वर म्हात्रे यांनी ग्रामीण कलाकारांना एका छताखाली आणणारे, नाट्य चळवळीतील अशोक म्हात्रे हे खरे शिलेदार आहेत. त्यांच्यातील नाट्यगुण समाजासमोर मांडण्याचे काम ते चांगल्या पद्धतीने करत असल्याची प्रतिक्रिया म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली. तर नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या अशोक म्हात्रे यांची धडपड आणि त्यांचे नाट्य क्षेत्रातील कार्य वाखण्याजोगे असल्याचे रंगकर्मी कृष्णकांत म्हात्रे यांनी सांगितले. शेवटी जयकिसन मोकल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रंगकर्मींसाठी खास स्नेहभोजनाचा बेत आखण्यात आला होता.







