| पनवेल | प्रतिनिधी |
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. ‘मनोहरम-कृष्णलीला’ या सूत्रावर आधारित कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केले.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत कृष्णाच्या बाललीलांपासून ते गीता-उपदेशापर्यंतचे विविध प्रसंग प्रभावीपणे सादर केले. पनवेल येथील पटेल ज्वेलर्सचे डायरेक्टर नवनीत पटेल यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाची प्रशंसा करत कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणार्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने दिलेले उपदेश आजच्या युगातही किती उपयोगाचे आहेत व त्यांचा अवलंब केल्यास जीवनातील अनेक समस्यांवर मात करता येते व सकारात्मकता प्राप्त करता येते, असे मत प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात मांडले. श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित हा अनोखा संस्कृतीदर्शक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरून उज्ज्वल चरित्र, योग्य-अयोग्य यातील फरक जाणणे याकरिता प्रेरणादायक अनुभव ठरेल, अशी आशा इंग्रजी माध्यम, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये केली. शीतल साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण वंदे मातरम् गायनाने या स्नेहसंमेलनाची सांगता झाली.