| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अश्विनी बिद्रेच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसातील इनस्पेक्टर अभय कुरुंदकरना दोषी ठरवण्यात आले आहे. लिव-इन पार्टनर अश्विनी बिद्रेची हत्या आणि तिचे तुकडे करून ते फेकून देण्यात आले. पोलिसांच्या तपासानंतर कुरुंदकर यांना न्यायालयाने 9 वर्षांनी दोषी ठरवले असून, 11 एप्रिल रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती.
पनवेल सत्र न्यायालयात खटला सुरू होता. 9 वर्षांनंतर न्यायालयाने इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यांना हत्येचा दोषी ठरवले. कुरुंदकर यांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणाऱ्या इतर दोघांनाही पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. आता त्यांना काय शिक्षा ठोठावण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच कुरुंदकर यांना 2017 साली राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल न्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले.
काय आहे प्रकरण ?
इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यांनी जे केलं ते अतिशय भयानक होतं. त्याच्यासोबत काम करणारी महिला पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हितच्या ते प्रेमात पडले. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. अभय कुरुंदकरचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. पण तरीही अश्विनी -अभयने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2014 मध्ये अश्विनी तिच्या पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर अश्विनी आणि अभय दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. अश्विनीच्या पतीला हे माहित होते पण अभयच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याची माहिती नव्हती. ती तिच्या मुलीला भेटण्यासाठी अधूनमधून तिच्या पती राजूच्या घरी जात असे, पण काही दिवसांनी तिने तिथे जाणेही बंद केले. अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. 2015 मध्ये, अश्विनीला बढती मिळाली आणि ती सहाय्यक पोलिस निरीक्षक बनली. पण एके दिवशी अचानक अश्विनी बेपत्ता झाली. अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 22 महिन्यांनी, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण उलगडले. अश्विनी आपल्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, असे अभयने पोलिसांना सांगितलं. पण आपली इमेज जपण्यासाठी अभय हा त्याची पत्नी आणि मुलांना सोडण्यास तयार नव्हता. याच मुद्यावरून झालेल्या भांडणादरम्यान अभयने अश्विनीचा खून केला. कुऱ्हाडीने तिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिले. याप्रकरणी पनवेल कोर्टात खटला सुरू होता, अखेर 9 वर्षांनी अभयला न्यायालयाने दोषी ठरवले असून आता 11 एप्रिलला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.