| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर असलेल्या कळंब ग्रामपंचायतीमधील भागूची वाडी या दुर्गम भागातील गावाला डांबरी रस्ता पोहोचला आहे. वनजमिनीमधून जाणारा रस्ता अनेक दशके होत नव्हता. मात्र, खा. श्रीरंग बारणे यांनी या गावासाठी रस्ता बनविण्यासाठी वन जमिनीमधून रस्ता तयार करण्याची परवानगी मिळविली होती. 2017 मध्ये कच्चा मातीचा रस्ता बनविण्यात आल्यानंतर खडीकरण आणि आता यावर्षी डांबरीकरण होत असून, भागूचीवाडी साठी पहिल्यांदा डांबरी रस्ता बनविला गेला आहे. भागूची वाडीसाठी आता कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने नवीन रस्ता आणि तो देखील डांबरी रस्ता बनल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.