| महाड | प्रतिनिधी |
शनिवारी रात्रीच्या सुमारास बिरवाडी शहरातील एसबीआय शाखेचे एटीएम मशीन फोडताना चोरट्यांना महाड एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे दहा मिनिटाच्या आत पोलीस घटनास्थळी पोहोचले व चोरी करीत असलेल्या दोन चोरांना रायफल दाखवीत मोठ्या शिताफीने रोखून धरण्यात आले. थोड्याच वेळात पोलीस ताफा आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
मनोज दत्तू सूर्यवंशी, रा. आंबेगाव, ता. देवणी, जि. लातूर व सुनील दशरथ गोगावले, रा. भालेकर कोंड, किंजलोळी, ता. महाड, जि. रायगड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएम मशीन चोरट्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांवर हल्लादेखील केल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एस.बी. काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे करीत आहेत. रात्रपाळीची गस्त घालीत असताना पोलीस हवालदार गोरेगावकर, पोलीस हवालदार अंबरगे, पोलीस नाईक शास्त्री, पोलीस शिपाई दळवे, पोलीस शिपाई सुरनर, पोलीस शिपाई पाटील यांनी एटीएम चोरांना पकडण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.