कामगारावर एमजीएम रुग्णालयात उपचार
। पनवेल । दीपक घरत ।
पगाराचे राहिलेले पैसे मागितल्याच्या रागातून दुकान मालक आणि त्याच्या सहकार्याने कामगारावर हल्ला केल्याची घटना कळंबोली वसाहतीत घडली. शिवीगाळ करत करण्यात आलेल्या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. छोटू रामसागर राय असे हल्ल्यात जखमी झालेल्या कामगाराचे नाव असून तो कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 1 परिसरात असलेल्या ए वन स्वीट मार्ट या दुकानात कामाला आहे.
याच ठिकाणी आरोपी संतोष पासवान याचे खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. छोटू राय हे काही दिवसापूर्वी पासवान यांच्याकडे कामाला होते. पासवान यांनी त्यांच्या पगाराचे पैसे बाकी ठेवले होते.सोमवारी (दि.28) छोटू आपल्या पगाराचे पैसे मागण्यासाठी पासवान यांच्याकडे गेला असता, पासवान याने छोटुवर चोरीचा आरोप करत शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी तिथे हजर असलेले दुकान मालक शकीया उर्फ सखाराम चौधरी यांनी देखील पासवान याला साथ देत छोटूला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यावेळी झालेल्या झाटापटीत पासवान याने मारहाणीसाठी अज्ञात हत्याराचा वापर केल्याने छोटू याच्या डोक्यात आणि पोटात गंभीर दुखापत झाली आहे. छोटू यांनी केलेल्या तक्रारी नुसार कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दोन्ही आरोपी कळंबोली पोलिसांच्या ताब्यात आहेत.