काळ्या फिती लावून सेवा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉ. वैभव साळुंखे यांना मारहाण केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक संघटना आणि मार्डच्या डॉक्टरांनी केला. या घटनेदरम्यान डॉक्टरांच्या मदतीला धावून आलेल्या परिचारिकांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याने डॉक्टर आणि परिचारिका यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी काळ्या फिती लावून नियमित आरोग्य सेवा सुरू ठेवत निषेध नोंदविला.
डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी चोवीस तास सेवा बजावत असते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांवर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाची असताना, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना डॉक्टरांनी व्यक्त केली.
कल्याण-डोंबिवली येथील घटनेप्रकरणी आरोपी रमेश म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू ठेवले. तसेच महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारणे, प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे, सर्वत्र सीसीटीव्ही यंत्रणा, प्रवेश नियंत्रण प्रणाली आणि तातडीची प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
डॉ. करण वाघमारे,
कल्याण-डोंबिवली येथे डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथील सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून आरोग्य सेवा बजावत आहेत. डॉक्टरांवर हात उगारणाऱ्यांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, हीच आमची ठाम मागणी आहे.
जनरल सेक्रेटरी, डॉक्टर शिक्षक संघटना
