दुरावलेले प्रवासी जोडण्याचा प्रयत्न

प्रज्ञेश बोरसे यांचे प्रतिपादन
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

एसटीच्या दिवसाला 2 लाख कि.मी.च्या फेर्‍या होऊन जिल्ह्यातून साधारण 60 ते 70 लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र एसटी बंदमुळे गेली तीन महिने हे उत्पन्न थांबले आहे. आता फक्त 700 ते 800 कि.मी.च एसटी फिरत आहे. मोठ्या प्रमाणात प्रवासीवर्ग तुटला आहे. प्रवासी जोडण्यासाठी महामंडळाने नाना प्रयत्न केले होते. आता तुटलेले प्रवासी पुन्हा एसटीकडे वळवणे, हे आमच्यापुढे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन एसटी विभागनियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संपाच्या भूमिकेवर त्या प्रसारमाध्यमांपुढे व्यक्त झाल्या. यावेळी 50 कंत्राटी कर्मचारी लवकरच हजर होतील. त्यांना प्रशिक्षण देऊन रत्नागिरी, लांजा, गुहागर या आगारात हजर करून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या बंदला तीन महिने होऊन गेले. एसटीची सार्वजनिक वाहतूक सुरू व्हावी, यासाठी कर्मचार्‍यांच्या पगारवाढीची मागणी मान्य करत 41 टक्के पगारवाढ दिली. अनेक कर्मचार्‍यांना त्याचा फायदा झाला. वेळेवर हा पगार होत असल्याचे एसटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले; मात्र एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यावर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. त्यामुळे बंद चिघळत गेला आहे. यावर काही बैठका झाल्या; मात्र त्या निष्फळ ठरल्या. बंद लांबतच गेला असून 3 हजार 499 एकूण एसटी कर्मचार्‍यांपैकी 852 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर वारंवार आवाहन करूनही हजर न होणार्‍या 250 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
अवैध वाहतुकीमुळे आधीच काही प्रवासी तुटले होते. त्याता तीन महिने एसटी वाहतूक बंद आहे. त्याचा मोठा फटका एसटीला बसणार आहे. हे सर्व प्रवासी जोडण्याचे आमच्यापुढे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील बहुतेक आगारामध्ये काही प्रमाणात एसटी फेर्‍या सुरू झाल्या आहेत; मात्र रत्नागिरी, लांजा आणि गुहागर आगारात कमी प्रमाणात फेर्‍या सुरू आहेत. कंत्राटी कर्मचारी मिळावेत, यासाठी महामंडळाला प्रस्ताव दिला होता, तो मंजूर झाला आहे.

जागा बदलण्याचे काम
जिल्ह्यात एसटीच्या 840 गाड्या आहेत. त्यापैकी काही गाड्या सुरू असल्या तरी अनेक गाड्या जागेवर आहेत. त्या सुस्थितीत राहाव्यात यासाठी दरदिवशी 5 मिनिटे या गाड्या सुरू ठेवून आगारातच या ठिकाणाहून त्या ठिकाणी असे त्यांचा जागा बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. तांत्रिक व इतर कर्मचार्‍यांमुळे सर्व गाड्या चांगल्या आहेत, असे बोरसे यांनी सांगितले.

एक दृष्टिक्षेप

Exit mobile version