चाणजे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न; अधिकाऱ्यांवर संगनमताचा संशय!

xr:d:DAFs4oA-MFI:10,j:7892959645108418212,t:23083002

| उरण | प्रतिनिधी |

चाणजे ग्रामपंचायतीतील कथित कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, चौकशीच्या नावाखाली संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संतप्त आरोप केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही उरण पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे.

घनःश्याम कडू यांच्या तक्रारीनुसार, 2015 ते 2024 या कालावधीत ग्रामनिधी व पाणीपट्टीच्या वसुलीतील लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी बँकेत न भरता थेट खर्च करण्यात आला. अनेक ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात असूनही चौकशी अधिकाऱ्यांनी कॅशबुक, व्हाऊचर व नोंदींची तपासणी न करता अपहार नाही, असा अहवाल सादर केल्याचा आरोप आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाची चौकशी खोपोलीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे यांच्याकडे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे. चौकशीबाबत वारंवार विचारणा केली असता निवडणूक हे कारण पुढे करून वेळकाढूपणा करण्यात आला. मात्र, निवडणुका संपून 2 महिने उलटूनही अहवाल तयार नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. त्यामुळे चौकशी लांबवण्यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे? मोठ्या आर्थिक व्यवहारामुळेच फाईल थंड बस्त्यात तर नाही ना, असे सवाल आता उघडपणे विचारले जात आहेत.

तक्रारदारांच्या मते, विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांनी चौकशी न करता खोटे अहवाल सादर करून वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल केली. तसेच, काही प्रकरणांमध्ये दप्तर उपलब्ध नसल्याचे कारण देत तक्रारी परस्पर निकाली काढण्यात आल्या. त्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, चौकशी अधिकारी प्रदीप कांबळे यांच्या कामकाजाचीही स्वतंत्र चौकशी करून, विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी ठाम भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे.

Exit mobile version