आकर्षक राख्यांनी बाजारपेठा सजल्या

बहिणींची खरेदीसाठी लगबग

। अलिबाग । प्रमोद जाधव ।
भावा बहिणीचे अतुट नाते असणारा रक्षाबंधन सण सोमवारी (दि.19) जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या व आकाराच्या राख्या दाखल झाल्या आहेत. पाच रुपयांपासून दोनशे रुपयापर्यंतच्या तसेच लहान मुलांच्या आवडीच्या असलेल्या कार्टूनच्या राख्यादेखील बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या राख्या खरेदीसाठी महिला व तरुणींची लगबग दिसून येत आहे.

बहिण भावाचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण एक दिवसावर येऊ ठेपला आहे. यंदाही रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा सण एकाच दिवशी येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. भावा बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठा राख्यांनी फुलून गेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राख्यांची दुकाने थाटली गेली आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील गावे, वाड्यांमधील दुकाने राख्यांनी सजली आहेत. राख्या खरेदीसाठी महिलांनी गेल्या आठ दिवसांपासून सुरुवात केली आहे.

यावेळी बाजारातील दुकानांमध्ये रुद्राक्ष, डायमंड, गोंडा ब्रेसलेट, सिल्व्हर मनी, छोटा भीम आदी वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या नवनवीन राख्या दाखल झाल्या आहेत. रक्षाबंधनला अवघा एकच दिवस शिल्लक राहिला असल्यामुळे शुक्रवार, शनिवारी दुकानांमध्ये राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी पहायला मिळाली. यावर्षीही राख्यांच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. मात्र, काही दुकानदारांनी ना नफा, ना तोफा हा विचार करीत राख्या विकल्या आहेत. यंदाही राख्यांच्या किंमतीमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

कार्टून राख्यांचे आकर्षण
रायगड जिल्ह्यातील बाजारात गेल्या वीस दिवसांपासून राख्या दाखल झाल्या आहेत. श्रीराम, शिव, ओम, कासव आदी चिन्ह असलेल्या राख्यांसह छोटा भीम, स्पायडर मॅन, डोरेमोन, अ‍ॅवेंजर, कॅप्टन अमेरिका आदी कार्टूनच्या राख्या खरेदीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सिल्व्हर प्लेटेड, गोंडा, डामयमंड, मोतीच्या राख्यादेखील बाजारात आहेत. या राख्यांची किंमत एक रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहे. आतापर्यंत 60 टक्के खरेदी झाली असून कार्टूनच्या राख्यांचे आकर्षण वाढले आहे. तसेच, या राख्या खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती राखी विक्रेते संदेश तुणतुणे यांनी दिली.
Exit mobile version