कर्णधार एलिसा हेलीला विजयी निरोप
| पर्थ | वृत्तसंस्था |
पर्थमध्ये भारतीय महिला संघाविरुद्ध पार पडलेल्या एकमेव दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी रविवारी (दि.8) 10 गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच, या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने कर्णधार एलिसा हेलीला विजयी निरोप दिला. हा सामना एलिसा हेलीलाचा ऑस्ट्रेलियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. दरम्यान, तिला सामन्यानंतर ऍश्ले गार्डनर आणि एलिसा पेरी यांनी मैदानात खांद्यावर उचलून घेत फिरवले.
या सामन्यात भारतीय संघाला दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया समोर 25 धावांचेच लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 4.3 षटकातच बिनबाद 28 धावा करत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वॉल 16 धावांवर आणि फोबी लिचफिल्ड 11 धावांवर नाबाद राहिली. तत्पुर्वी, या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 62.4 षटकात सर्वबाद 198 धावा केल्या होत्या. भारताकडून जेमिमाह रोड्रिग्सने 54 धावांची खेळी केली होती; तर, शफाली वर्माने 35 आणि काशवी गौतमने नाबाद 34 धावा केल्या होत्या. बाकी कोणाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नव्हता. ऑस्ट्रेलियाकडून ऍनाबेल सदरलँडने सर्वाधिक 4 बळी, लुसी हॅमिल्टनन 3 बळी, डार्सी ब्राऊनने 2 बळी, तर ऍश्ले गार्डनरने 1 बळी घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 90.4 षटकात सर्वाबद 323 धावा करत 125 धावांची आघाडी घेतली. या डावात ऍनाबेल सदरलँडने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही कमाल करताना 129 धावांची शतकी खेळी केली. तसेच, एलिस पेरीने 76 धावा केल्या. कर्णधार एलिसा हेली मात्र तिच्या शेवटच्या डावात 13 धावांवर बाद झाली. ऍलना किंगने 21 आणि लुसी हॅमिल्टनने 23 धावांचे योगदान दिली. भारताकडून गोलंदाजी करताना सायली सतघरे चमकली. तिने 4 बळी घेतले. तसेच, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, स्नेह राणा आणि शफाली वर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. दुसऱ्या डावात भारतीय संघ 48.2 षटकात 149 धावांवरच बाद झाला. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर 25 धावांचेच लक्ष्य ठेवता आले. या डावात प्रतिका रावलने 63 धावा केल्या, तर स्नेह राणाने 30 धावांची खेळी केली. बाकी कोणी 15 धावांचा टप्पाही पार करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून लुसी हॅमिल्टनने 3 बळी घेतले, तर ऍनाबेल सदरलँड, ऍलना किंग, ऍश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तसेच, डार्सी ब्राऊनने 1 बळी घेतला. एलिसा हेलीलाने निवृत्ती घेणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यामुळे तिच्यासाठी हा भावनिक सामनाही होता. या सामन्याच्या अंती हेलीला विजयी निरोप देण्यात आला.
एलिसा हेलीलाची कारकिर्द
2010मध्ये वयाच्या 19व्या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलेल्या एलिसा हेलीने 11 कसोटी सामन्यात 3 अर्धशतकांसह 502 धावा केल्या आहेत. तसेच, 126 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 8 शतके आणि 19 अर्धशतकांसह 3,777 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 162 सामन्यांत तिने 1 शतक आणि 17 अर्धशतकांसह 3054 धावा केल्या आहेत. ती महिला आणि पुरुष मिळून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी यष्टीरक्षक देखील आहे. तिने आंतरराष्ट्रीय संघात यष्टीरक्षक म्हणून 126 बळी घेतले असून त्यात 63 झेल आणि 63 यष्टीचीतचा समावेश आहे. हेलीने तिच्या कारकिर्दीत एकूण 7 विश्वचषक जिंकले आहेत. ती 2018 आणि 2019 मध्ये आयसीसीची सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडूचा पुरस्कार जिंकणारी खेळाडू आहे.
