महिला संघाचा अंतिम फेरीत प्रवेश
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
ऑस्ट्रेलियाने 338 धावा केल्यानंतर भारताला हलक्यात घेण्याची चूक केली. पण, नवी मुंबईच्या खेळपट्टीवर क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जने मॅच विनिंग शतक झळकावले. दोन्ही सलामीवर कमी धावसंख्येवर माघारी परतल्यानंतर जेमिमाने कर्णधार हरमनप्रीत कौरसह विक्रमी भागीदारी केली. या दोघींच्या खेळीने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आणि जेमिमाने ऑस्ट्रेलियाचा निकाल लावला. भारताने रोमहर्षक विजयाची नोंद करताना महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता त्यांना फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे.
शफाली वर्मा ( 10) व स्मृती मानधना ( 24) या दोन्ही ओपनर माघारी परतल्यानंतर भारतीयांना टेंशन आलं होतं. पण, जेमिमा रॉड्रिग्ज व हरमनप्रीत कौर यांनी अविश्वसनीय खेळ केला. ऑस्ट्रेलियाच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करता येऊ शकतो, या सकारत्मकतेने त्यांनी खेळ केला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली हिने जेमिमाचे दोन झेल टाकले आणि यष्टिंमागे चुकाही केल्या. त्याचा या दोघींनी पुरेपूर फायदा उचलला. भारतीय कर्णधार 88 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकारांसह 89 धावांवर बाद झाली आणि जेमिमासह तिची 156 चेंडूंत 167 धावांची भागीदारी संपुष्टात आली. जेमिमा व दीप्ती शर्मा ( 24) यांनीही 38 धावा जोडून आवश्यक रन रेट कमी केला. जेमिमाने 114 चेंडूंत शतक पूर्ण केले आणि तिला 107 धावांवर असताना मॅग्राने सोपा झेल सोडून पुन्हा जीवदान दिले. हा झेल सूटला तेव्हा भारताला विजयासाठी 40 चेंडूंत 60 धावा करायच्या होत्या. हरमनप्रीतनंतर ( नाबाद 171 धावा वि. ऑस्ट्रेलिया, 2017) वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत किंवा फायनलमध्ये शतक झळकावणारी जेमिमा दुसरी भारतीय महिला फलंदाज ठरली.
रिचा घोषने 16 चेंडूंत 26 धावा करताना जेमिमासह 41 धावा जोडल्या. तिने सामना 24 चेंडूंत 29 धावा असा जवळ आणून दिला. तीन षटकांत भारताला 23 धावा करायच्या होत्या आणि जेमिमा अजूनही खिंड लढवत होती. जेमिमाने रिव्हर्स शॉटने सुरेख चौकार मिळवला. पुन्हा लेट कटने चौकार मारून 14 चेंडूंत 10 धावा असा सामना आणला. भारताने 5 विकेट्स राखून सामना जिंकला.
महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सर्वात मोठा यशस्वी लक्ष्याचा पाठलाग ठरला. यापूर्वी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणम येथे भारताच्या 331 धावांचा पाठलाग केला होता. जेमिमा 134 चेंडूंत 14 चौकारांसह 127 धावांवर नाबाद राहिली .दरम्यान, फोएबे लिचफिल्ड( 119), एलिसा पेरी ( 77) व ॲश्लेघ गार्डनर ( 63) यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 338 धावांचा डोंगर उभा केला. लिचफिल्ड व पेरी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 133 चेंडूंत 155 धावांची भागीदारी केली. गार्डनरसह किम गार्थ ( 17) उभी राहिली आणि दोघींनी 41 चेंडूंत 66 धावा जोडल्या. दीप्ती शर्मा व क्रांती गौड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.







