न्यायालयाच्या आवारातच हृदयविकाराचा झटका
। रायगड । प्रतिनिधी ।
चोंढी गावातील तब्बल 12 वर्षांपूर्वी घडलेल्या मारामारी प्रकरणातील निकाल जाहीर झाल्यानंतर निर्दोष सुटलेल्या नितेश सुनील गुरव याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ आणि अन्य काही साथीदारांना शिक्षा ठोठावण्यात आली होती, तर काही जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. याच निर्दोष सुटलेल्या नितेश सुनील गुरव या व्यक्तीने निकालाचा धक्का सहन न होताच काही तासांत प्राण सोडल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, चोंढी गावात 12 वर्षांपूर्वी दोन गटांमध्ये झालेल्या वादातून मारामारी झाली होती. या घटनेत काही जण जखमी झाले होते, तर गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने बुधवारी (दि. 30) निकाल दिला. न्यायालयाने दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ आणि त्यांच्या काही साथीदारांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली, तर काहींना निर्दोष मुक्त केले. निर्दोष मुक्त झालेला नितेश सुनील गुरव हा या निकालानंतर न्यायालयाबाहेर आल्यानंतर काही काळ तो भावनिक अवस्थेत होता. सहकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, नितेश सुनील गुरव याने प्रकरणातील दीर्घ मानसिक ताण, न्यायालयीन चढ-उतार आणि निकालाचा ताण सहन न झाल्याने झिराड येथील घरी जातना अचानक छातीत दुखू लागले होते म्हणून नितेश सुनील गुरव याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीयच त्याचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. नितेश सुनील गुरव याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले.





