ऑटोमॅटेड टॉयलेट उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

पनवेल रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला नवी मुंबई महानगर परिवहन बस डेपो बसथांब्यालगत अत्याधुनिक ऑटोमॅटेड सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. पंरतु, ते गेल्या चार महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने बंद अवस्थेत आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही सुविधा अद्याप नागरिकांच्या सेवेत न आल्याने पनवेल महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून दररोज हजारो प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. याच ठिकाणी नवी मुंबई महानगर परिवहनचे अधिकारी व कर्मचारीही कार्यरत आहेत. मात्र, सार्वजनिक शौचालय बंद असल्याने नागरिकांना नैसर्गिक विधीसाठी पनवेल रेल्वे स्थानकातील दूरवर असलेल्या शौचालयाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व सुविधा तयार असूनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हे शौचालय बंद ठेवण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. जनतेच्या करातून उभारलेली सुविधा नागरिकांच्या उपयोगासाठी आहे की केवळ उद्घाटन सोहळ्यासाठी, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.

Exit mobile version