। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथे नितेश कडू फाउंडेशन यांच्या सौजन्याने आयोजित मर्यादित षटकांचे टेनिस बॉलचे क्रिकेटस्पर्धा 15 व 16 मार्च असे दोन दिवस भरवण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन भारतीय सेनेचे सेवानिवृत्त सैनिक सुदिन लक्ष्मण पाटील व दिलीप बाळकृष्ण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अभिलाष माळवी, प्रिया दिनेश कडू, दिनेश कडू आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत ग्रामीण भागातील 24 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना नागेश्वर आवास संघ व वाघेश्वरी धोकवडे संघात होऊन अटीतटीच्या लढतीत नागेश्वर आवास संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर वाघेश्वरी संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक नितेश कडू पुरस्कृत मांडवा जेट्टी या संघाने पटकाविला. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज योगेश गोठणकर धोकवडे तर उत्कृष्ट फलंदाज विशाल सुखदरे धोकवडे आणी मालिकावीर समीर पारकर आवास यांनी पटकाविले. या विजयी संघांना व उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान करत आकर्षक बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले.