‌‘सेवा संकल्प‌’मधून योजनांचा जागर

| पेण | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‌‘सेवा संकल्प अभियान‌’ अंतर्गत पेण येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्यावतीने ‌‘संकल्प रथ प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाचा‌’ उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासह योजनांची जनजागृती केली जाणार आहे.

पेण येथे झालेल्या कार्यक्रमाला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैकुंठ पाटील, आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, तहसीलदार तानाजी शेजाळ, पंचायत समिती सदस्य कमल पवार, लाभार्थी गुलाब वाघमारे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. दि.17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‌‘सेवा संकल्प अभियान‌’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून सेवा सेतू, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट आणि नमो सेवागाथा यांसारखे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, जलसंधारण आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच, या अभियानातून शासनाच्या योजना कागदावर न राहता त्या लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी संकल्प रथाच्या माध्यमातून आदिवासी भागात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Exit mobile version