रमेश धनावडेंच्या ‘कवितेच्या सुरातून’ पुस्तकास पुरस्कार

| नागोठणे | वार्ताहर |

कोकण मराठी साहित्य परिषदेचा संकीर्ण विभागातील प्रथम पुरस्कार रमेश प्रभाकर धनावडे यांच्या ‘कवितेच्या सुरातून’ या पुस्तकास जाहीर झाला आहे. पुढील आठवड्यात होणार्‍या कार्यक्रमामध्ये मालगुंड, रत्नागिरी येथे हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

आजवर रायगड भूषण पुरस्कारापासून अनेक पुरस्कार रमेश धनावडे यांना मिळाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचा हा मिळालेला पुरस्कार निश्‍चितच माझ्यासाठी दिलासादायक, आनंददायक व भविष्यासाठी दिशादर्शक आहे असे रमेश धनावडे यांनी सांगितले. कवितेच्या सुरातून या पुस्तकामध्ये साडेआठशे वर्षापूर्वीचे संतकवी ते आजवरल्या कवींची अशी एकूण 63 प्रथितयश साहित्यिक कवींची यशोगाथा त्यांनी अधोरेखित केली आहे. या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून सर्वांनाच उपयोग होत आहे त्यामुळे या पुस्तकाला अल्पावधीतच खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या पुस्तकात त्यांनी सर्वच प्रतिथयश साहित्यिक-कवींना न्याय दिला आहे. संत ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा, गालिब, मीराबाई, कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, वा.रा.कांत, जगदीश खेबुडकर ना.धो. महानोर, अमर शेख, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, सुरेश भट, नामदेव ढसाळ, दया पवार, मंगेश पाडगावकर, एके शेख, गुरु ठाकूर, संदीप खरे यासारख्या अनेक जुन्या नव्या प्रथितयश कवींच्या निवडक कविता, त्याचे विश्‍लेषण, कवी विषयी संपूर्ण माहिती त्यांनी या पुस्तकात दिली आहे. एकच पुस्तकामध्ये एवढ्या सगळ्या कवींना एकत्र घेऊन त्याने हा एक 316 पानांचा ऐतिहासिक दस्तावेज तयार केला आहे. त्यामुळेच अल्पावधीतच हे पुस्तक रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.

Exit mobile version