| नेरळ | प्रतिनिधी |
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणारे शेतीनिष्ठ शेतकरी आणि कृषी भूषण शेतकरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावेळी हा पुरस्कार कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी वदप येथील विनय वेखंडे आणि पेण तालुक्यातील मसदबेडी येथील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांना जाहीर झाला आहे. कृषी दिनी या पुरस्कारांचे वितरण होणार असून, विनय वेखंडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक कृषी पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली आहे. सन 2023-24 मधील शेतीनिष्ठ शेतकरी आणि कृषी भूषण शेतकरी यांची घोषणा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारात 2023च्या पुरस्कारामध्ये कर्जत तालुक्यातील वदप गावातील शेतकरी विनय मारुती वेखंडे यांचे नाव जाहीर झाले आहे. वेखंडे यांच्याकडे दुबार शेती केली जात असून, खरीप हंगामात भाताचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. राज्य सरकारच्या भात पीक स्पर्धेत वेखंडे यांनी यापूर्वी हेक्टरी सर्वाधिक भाताचे उत्पादन करून पुरस्कार मिळवला आहे. तर, रग्बी हंगामात राजनाला कालव्याच्या पाण्यावर कडधान्य तसेच भाजीपाला शेती करीत असतात. शेतीमधून पिकणाऱ्या पिकावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून शेती करण्याचे त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे वेखंडे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, तालुका कृषी अधिकारी दिनेशकुमार कोळी यांनी ही माहिती दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान
