जिल्हा परिषदेच्या सीईओंची संकल्पना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर दोन दिवसीय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी (दि.15) व शुक्रवारी (दि.16) हे शिबीर घेतले जाणार असून त्यात रोजगाराबाबत जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनी शिबिरांमध्ये सहभागी होऊन वैयक्तिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती असून 1 हजार 975 गावे आहेत. ग्रामीण भागाची लोकसंख्या सुमारे 16 लाख 64 हजार इतकी आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देणे आणि कुशल व अकुशल कामांच्या मदतीने ग्रामीण भागातील उत्पन्न व पायाभूत सुविधा विकसित करणे हा उद्देश समोर ठेवून शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी फळबाग लागवड, वृक्ष लागवड, बांबु लागवड करण्यासाठी 1 लाख 69 हजार रुपयांचे अनुदान 3 वर्षांसाठी देण्यात येते. तसेच, वैयक्तिक विहीरीसाठी 5 लाख, शेतीची बांधबंधिस्ती व दुरुस्ती 25 हजार प्रति हेक्टरी, वैयक्तिक शौचालय 12 हजार, शोषखड्डा, कंपोस्ट खड्डा 5 हजार, शेळी पालन व कुक्कुटपालन शेड 50 हजार, गोठा शेड 1 लाख 77 हजार रुपये असा लाभ देण्यात येणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
ग्रामपंचायतींनी गावातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच, नागरिकांनी कामाच्या मागणीसाठी आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.