| सोगांव । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून बहिरोळे येथे बिबट्याने अनेकांना दर्शन देत मानवीवस्ती जवळील कुत्रा व इतर प्राण्यांची शिकार केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे सकाळी व्यायामाच्या दृष्टीने चालत जाणारे, शाळेत व कॉलेजला जाणारी मुले, कामावर तसेच शेतावर जाणारे शेतकरी यांच्यामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. यावर वनविभागाने सदर बिबट्यापासून ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावेत, असे निवेदन अलिबाग तालुक्यातील बहिरोळे ग्रामस्थांनी नुकतेच वनविभागाला दिले होते.
काही प्रमाणात उपाययोजना वनविभागाने बहिरोळे ग्रामस्थांसाठी जनजागृती पर कार्यक्रम RESQ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या संस्थेचे कार्यकर्ते नचिकेत उत्पात, नरेश चांडक यांच्यामार्फत आयोजित केला होता. यावेळी ग्रामस्थांना बिबट्या वैरी नाही, शेजारी या जनजागृतीपर चित्रफितीद्वारे बिबट्या व इतर वन्यप्राण्यांची माहिती देण्यात आली. बिबट्या या वन्यप्राण्यांच्या बाबतीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचे निरसरण करण्यात आले. तसेच बिबट्या या प्राण्याविषयी निर्माण झालेली भीती व गैरसमज कमी करण्यासाठी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाला बहिरोळे ग्रामस्थांसोबत मापगांव ग्रामपंचायत हद्दीतील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच सुनिल थळे, विवेक जोशी, श्री. चांदोरकर, राजेंद्र घरत, सचिन घाडी, प्रफुल्ल थळे यांच्यासह वनविभागाचे वनपाल शिवाजी जाधव, दिपक मोकल, तुकाराम जाधव, वनरक्षक मौलेश तायडे, पंकज घाडी, सौरभ पाटील, स्नेहा म्हात्रे, वनमजुर जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.