। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यामधील सुप्रसिद्ध माऊंट कार्मेल हायस्कूल कोर्लईचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. सदरील वार्षिक स्नेहसंमेलनाचा विषय हा जनजगृती करणारा होता. मनुष्याला आज पर्यावरण समतोल राखणे खूप आवश्यक आहे. पर्यावरणाचा र्हास होऊ नये यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यासाठी या हायस्कूलने आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनात पर्यावरणाची जनजागृती करण्यासाठी लोकप्रबोधनपर पर्यावरण वाचवण्यासाठी व जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व गाणी व त्यावरील नृत्य पर्यावरण विषयक ठेवण्यात आली होती.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्धघाटन रेव्ह फादर नॉरबर्ट डिसोझा व या हायस्कूलचे चेरमन रेव्ह.फादर बोनाव्हेंचर नुनीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. माऊंट कार्मेल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युली चांदी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील वेगस, माजी विद्यार्थिनी मनस्वी वाडकर, त्याचप्रमाणे सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधील सर्व सिस्टर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रेव्ह फा. नॉरबर्ट डिसोझा यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पर्यावरण आधारित संदेश पर नृत्य व नाटिका यांचे विशेष कौतुक केले. शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष रेव्ह फा. बोनवेंचर यांनी वर्तमानकाळात आपण पशु, पक्षी, वृक्ष या सर्व पर्यावरणातील घटकावर आपण प्रेम केले पाहिजे. जसे आपण आपसातील संबंध जोपसत असतो त्याचप्रमाणे निसर्गावरसुद्धा प्रेम करून वनसंपदा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, असा मोलाचा संदेश आपल्या भाषणातून दिला. इयत्ता पहिली ते दहावीमधील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटिका, गाणी व वाद्यवादन सादर केले.