मंत्रयुद्ध अभ्यास शिबिराची यशस्वी सांगता
। पोलादपूर । वार्ताहर ।
माजलेला एक अफजल मोठ्या हिकमतीने जावळीच्या खोर्यात आणवून समूळ संपवला म्हणजेच काय तो पराक्रम नसून शिवछत्रपतींच्या या अद्वितीय कल्पक पुरुषार्थापासून शिकवण घेवून आपल्या नित्य व्यवहारात येणार्या लहान-मोठ्या प्रत्येक संकटाला बुद्धीकौशल्याने सामोरे जावून जीवन निष्कंटक करायला शिकण्यासाठी या जावळीच्या खोर्यात येवून श्रीप्रतापगडीचे मंत्रयुद्ध आत्मसात करण्याची गरज शिवचरित्राचे गाढे अभ्यासक डॉ. संदीप महिंद गुरुजी यांनी व्यक्त केली. गेल्या 12 वर्षांपासून प्रचलित असणार्या दुर्गाभ्यास शिबिराच्या समारोप प्रसंगी शिवरायांनीच वसवलेल्या व घडविलेल्या शौर्यभूमी प्रतापगडाच्या भवानी मंडपात ते बोलत होते.
अफजलखान सुमारे बावीस हजाराचे अफाट लष्कर व प्रचंड साधनसामुग्री घेवून स्वराज्यावर चालून आला असता कोणत्याही सहकार्याचे अवसान गळू न देता शिवाजी महाराजांनी कौशल्याने आपला प्रत्येक मावळा या संकटाचा सामना करण्यासाठी सिद्ध केला. सह्याद्रीच्या मुशीतील सामान्यातील सामान्य माणसांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न टिकविण्यासाठी असामान्य कार्य करुन पाशवी दहशतवाद संपविण्याचा आदर्श वस्तूपाठ आपल्यासमोर घालून दिल्याचे, त्यांनी ठणकावून सांगितले.
जीवनात अनेकानेक संकटे येतात ती आपली परीक्षा पाहण्यासाठी नसून आपल्यातील पुरुषार्थाला केवळ जागविण्यासाठीच असतात, याची जाणीव हे प्रतापगडीचे मंत्रयुद्ध प्रत्येकात निर्माण करत असते. शिवाजी महाराजांचे देदीप्यमान चरित्र केवळ ऐकून, वाचून, पाहून काहीही होत नाही तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जिजाऊ विद्यापीठात त्याचा व्यावहारिक साक्षात्कार अनुभविण्याचा आग्रह त्यांनी याप्रसंगी सर्वांना धरला. बेळगावसह महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यातून आलेल्या शेकडो मातृशक्ती व मुलांचा सहभाग या दुर्गाभ्यास शिबिरात घेतला होता.