मुंबई-गोवा महामार्गावरील सावली हरपली
। कोलाड | विश्वास निकम |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग असुन या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी दोन्ही बाजूंना असलेली लहान-मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. ही झाडे प्रवाशांसह शेतकरी व वाटसरू यांना सावली देत होती. आता दोन्ही रस्त्याच्या मधोमध फुल झाडे लावण्यासाठी सुरुवात केली आहे. परंतु, सावली देणार्या झाडांची लागवड केव्हा होणार? अशी प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपादरीकरणासाठी या महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारी झाडे तोडण्यात आली आहेत. याला आता 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तोडण्यात आलेल्या झाडांच्या लाकडांची विक्री करून लाखो रुपये कमवले; परंतु, तोडण्यात आलेल्या झाडांच्या जागी कोणतीही नवीन झाडे लावण्यात आलेली नाहीत. यामुळे पशु, पक्षी, प्राणी, तसेच प्रवासी वर्गाला मिळणार्या सावलीचा आधार हरपला आहे.
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात येणार्या लहान मुलांच्या तोंडावर असणारे ‘झुक-झुक झुक-झुक अगीनगाडी.. पळती झाडे पाहु या..’ गाण्याचा वृक्ष तोडीमुळे जणू विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. या वृक्ष तोडीमुळे हळूहळू वातावरणात देखील बदल होत चालले असुन पूर्वी वेळेवर पडणारा पाऊस, विशिष्ट कालावधीत पडणारी थंडी, उन्हाळा यांमध्ये फरक जाणवू लागला आहे. याचा आरोग्यावर ही परिणाम होऊ लागला आहे. यामुळे वृक्ष लागवड केली नाही तर भविष्यात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा स्थानिक तसेच प्रवासी वर्गात होत आहे.
आतातरी वृक्ष लागवड करावी
मुंबई-गोवा हायवेवरील दोन्ही मार्गाचे काम सुरु असुन दोन्ही बाजूच्या मधोमध फुल झाडे लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या फुलझाडांना पाणी घालण्याचे काम देखील केले जात आहे. याबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सवाली देणारी झाडे लावण्याचे काम सुरु केले असते प्रवासी वर्गाला त्यांच्या सावलीचा आधार झाला असता. परंतु, नियोजन शुन्य असल्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे जर 17 वर्षांपूर्वी केले असते तर आजपर्यंत या महामार्गावर निसर्ग फुलला असता. यामुळे आतातरी वृक्ष लागवड करण्यात यावी, अशी मागणी वाटसरू तसेच प्रवासी वर्गातून केली जात आहे.