शिव प्रतिष्ठान करंजाडेचा स्तुत्य उपक्रम
| उरण | प्रतिनिधी |
शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या माध्यमातून नेहमी समाजात विविध विषयावर जनजागृती केली जाते. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, विनाश लक्षात घेता, सजीव सृष्टीचे धोक्यात असलेले अस्तित्व लक्षात घेता पर्यावरणाचे, निसर्गाचे संरक्षण संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या पदाधिकारी सदस्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे.
शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने ‘एक झाड करंजाडेच्या मातीसाठी, एक झाड ऑक्सिजनयुक्त करंजाडेसाठी’ ही संकल्पना मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी करंजाडे येथे वड, पिंपळ, लिंब यासारखी अनेक ऑक्सिजनयुक्त झाडे लावून तसेच मोफत लोकांना झाडे वाटप कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी करंजाडेमधील लोकांना शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या वतीने आवाहन करण्यात आले की, कोणावर अवलंबून न राहता आपली कामे आपणच केली पाहिजे, तरच आपला गाव शहर हा संघटित होऊ शकतो. प्रत्येकाने झाडे लावा, वृक्ष लावा जेणेकरून पर्यावरणाचे, निसर्गाचे संवर्धन, संरक्षण होईल. या कार्यक्रमास शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुरेश बार्वे, अमर कुसळे, अमर सावंत, नवनाथ सहाणे, सतीश चालगे, तुषार कदम, योगेश कुलाल, अंबाराया पुजारी, समीर कांबळे आदी पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.







