मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बाळाचा जन्म

| पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यात ऐन वेळी वीज गायब होणे हे नेहमीचे झाले आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. वीज गायब असतानाही जांभूळपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील (पीएचसी) डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती पार पाडल्याचे समजते.

जांभूळपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 26 वर्षीय रोहिणी रवी वाघमारे यांना प्रसूती वेदना होत असल्याने भरती करण्यात आले. पीएचसीमध्ये सकाळी दहापासून वीज नव्हती. तसेच सोलार यूनिटमध्येही बिघाड झाला होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांना मोबाईल टॉर्चचा वापर करावा लागला. तीन मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात दुपारी 1 वाजून पन्नास मिनिटांनी प्रसूती पार पडली. बाळाचे वजन 2 किलो 400 ग्राम असून ते निरोगी आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता म्हात्रे, डॉ. तुषार म्हेत्रे, आरोग्य सहाय्यक सविता रणखांबे, समुदाय आरोग्य अधिकारी सूरज कडू, आरोग्य सेविका अनुष्का थाले, आशा सेविका ज्योत्स्ना शिंदे व स्त्री पारिचारिका कल्पना महाजन या टीमने ही प्रसूती पार पाडली.

Exit mobile version