। रायगड । प्रतिनिधी ।
वयोवृद्धांच्या मदतीसाठी सरकारने वयोश्री योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्यांना तीन हजार रुपये दिले जातात; मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमवण्यासाठी वृद्धांना करावी लागणारी धावपळ कित्येक पटीने जास्त आहे. ऊन-पावसात वयोवृद्ध बँका, तहसील कार्यालय, सेतू केंद्रात तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र, आता रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 18 हजार अर्ज समाजकल्याण विभागाकडे आले आहेत. परिपूर्ण अर्जांची तपासणी केल्यानंतर यातील साधारण चार हजार अर्जदार योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाने दिली. इतर जिल्ह्यांच्या प्रमाणात रायगड जिल्ह्याची आकडेवारी खूपच कमी आहे. योजनेतील क्लिष्टतमुळे तळा, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यातील नागरिकांनी दमछाक टाळण्यासाठी वयोश्री योजनेतून काढता पाय घेतला आहे.
सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना काढली आहे. योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील नागरिकांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हजार रुपयांसह वृद्धावस्थेमुळे ज्यांना ऐकण्यात, दिसण्यास आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवणयंत्रासह अनेक आवश्यक उपकरणे देण्यात येतात. वयोश्री योजनेचे लाभार्थी होण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागते. यातील अनेक वृद्धांच्या हाताचे ठसे व्यवस्थित उमटत नसल्याने आधार कार्ड पुन्हा अपडेट करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते, यासाठी उतारवयात तालुक्याला फेर्या मारणे खूपच त्रासदायक होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयानुसार विविध समस्या जाणवत असतात. त्याचबरोबर वयोमानपरत्वे येणार्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात साधारण 16 हजार अर्ज आले आहेत. यातील आठ हजार अर्जांची डाटा एन्ट्री झाली असून चार हजार अर्ज योजनेसाठी पात्र होतील. मात्र, या योजनेसाठी असलेला निधी अद्याप आलेला नाही. योजनेचा लाभ एकदाच घेता येणार असून योजना मंजूर झाल्याच्या तारखेनंतर साहित्याची खरेदी केलेल्या वस्तूंची खरेदी पावती कार्यालयात पोच झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
– सुनील जाधव, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड