एकनाथ शिंदे सरकार एरवी फारसे कार्यक्षम दिसलेले नाही. अवकाळी पावसामुळे अर्ध्या महाराष्ट्राची शेती बुडाली. पण सरकारच्या पायाला चाके लागली आहेत असे झाले नाही. भाजपचा अजेंडा राबवण्याच्या बाबतीत मात्र वेगवान पावले टाकली जात आहेत. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांवर लक्ष ठेवणारी समिती स्थापन करण्याचा निर्णय हे याचेच एक उदाहरण आहे. महिला आणि बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची ही समिती काम करणार आहे. जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये होणार्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांच्या विशेष नोंदी ठेवल्या जाणार आहेत. ही लग्ने संमतीने झाली की कुटुंबाच्या मर्जीविरोधात याची माहिती जमा केली जाणार असून संबंधित कुटुंबांशी संपर्क ठेवला जाणार आहे. मंत्री लोढा यांनी समितीची घोषणा करताना श्रध्दा वालकर प्रकरणाचा संदर्भ दिला. तिच्या हत्येला सहा महिने होऊन गेले तरी त्याची कल्पना कुटुंबियांना नव्हती. तसे घडू नये यासाठी ही समिती काम करणार आहे. वरवर पाहता, सरकारने मानवतावादी भूमिकेतूनच हे पाऊल उचलले आहे असा कोणाचा समज होऊ शकतो. पण आपला समाज, पोलीस आणि भाजपसारख्या पक्षांच्या संघटना यांची ज्यांना ओळख आहे त्यांना या समितीच्या आडून प्रत्यक्षात काय घडेल याची कल्पना करता येईल. भिंतींवरच्या दिनदर्शिकांनुसार आपण एकविसाव्या शतकात आलो असलो तरी समाज म्हणून आपण अजूनही एकोणिसाव्या शतकात आहोत. जातींच्या आणि धर्माच्या भिंती मोडून पडलेल्या नाहीत. जाती व धर्माबाहेरची लग्ने हा अजूनही विवाद्य विषय आहे. त्यातच भाजपने अलिकडे लव जिहादसारख्या कल्पनांच्या आडून समाजात पूर्वी कधीही नव्हते असे विष पेरायला सुरुवात केली आहे. हिंदू मुलींनी मुस्लिम मुलाशी मैत्री केली वा नंतर प्रेमात पडून लग्न केले तर भाजप परिवारातील संघटनांना ते खपत नाही. हिंदूंचे धर्मांतर घडवण्यासाठी मुस्लिम समाजाचे हे मोठे कारस्थान आहे असा दावा या संघटना करतात. यालाच त्यांनी लव जिहाद असे नाव दिले असून होणारे प्रत्येक लग्न याच चष्म्यातून ते पाहतात. या देशात 85 टक्के लोक हिंदू आहेत. शेकडो वर्षांपासून या देशात बाहेरून मुस्लिम, ख्रिश्चन वा अन्य लोक आले. काही ठिकाणी धर्मांतरेही झाली. पण ते धर्मांतरितही याच संस्कृतीत राहिले. शिवाय, इतके होऊनही हिंदूंच्या बहुसंख्येला धक्का लागला नाही. आता तर नरेंद्र मोदी यांचे अत्यंत कडवे आणि सामर्थ्यशाली सरकार सत्तेत आहे. असे असूनही मुस्लिम लोक धर्मांतरे घडवून आणून आपली बहुसंख्या करू पाहत आहेत असा एक अत्यंत घातकी प्रचार कुटील बुध्दीच्या लोकांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आहे. आश्चर्य म्हणजे भलेभले बुध्दिमंतही त्याला बळी पडत असतात. खरे तर जबरदस्तीने वा काहीतरी आमिष दाखवून धर्मांतर करणे हा आजही कायदेशीर गुन्हा आहे. तसे प्रकरण आढळल्यास पोलीस कारवाई करू शकतातच. पण ते लपवून ठेवून धर्मांतराचे मोठे कारस्थान चालू आहे अशी आवई उठवणे हे भाजपला राजकीयदृष्ट्या सोईचे आहे. मंत्री लोढांनी स्थापन केलेली समिती हादेखील याच प्रचाराचा भाग आहे. श्रध्दा वालकर हत्या ही कथित लव जिहादचा भाग होती अशी माहिती कोठेही पुढे आलेली नाही. श्रध्दा ही स्वखुषीने त्या संबंधांत होती. असे असूनही तिचा खोटा संदर्भ देऊन हा समाजापुढचा प्रचंड मोठा प्रश्न आहे असे भासवणे अत्यंत घृणास्पद आहे. लोढा आणि त्याच्या आजूबाजूंच्याची मानसिकता लक्षात घेता ही प्रस्तावित समिती आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्ने करणार्यांवर हर प्रयत्नांनी दबाव आणेल हे स्पष्ट आहे. बहुतांश पोलिस वा सरकारी अधिकारी हेदेखील अशाच बुरसटलेल्या प्रचाराचे बळी आहेत. त्यामुळे संबंधित कुटुंबांचे प्रबोधन होण्याऐवजी या यंत्रणामार्फत भाजपच्या विचारांचा प्रचार होण्याची शक्यता अधिक आहे. एकेकाळी जातीव्यवस्था मोडण्यासाठी जातीबाहेर लग्ने केली पाहिजेत असा आग्रह आपल्या समाजसुधारकांनी धरला होता. आता अशी लग्ने घातक असल्याचा समज या समितीमार्फत तयार केला जाणार आहे. महाराष्ट्राला सतराव्या शतकात नेणारे हे पाऊल आहे.