मागासवर्गीयांना मिळणार उभारी

। अलिबाग । प्रमोद जाधव |

अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यातून त्यांना बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावणे हा उद्देश समोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे. नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण सुक्ष्म सिंचन संच, वीज जोडणीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान 10 हजार रुपयांपासून अडीच लाखापर्यंत आहे.

अनुसूचित जातीमधील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी 60 लाख रुपये, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी (क्षेत्राबाहेरील-क्षेत्राआतील) 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 300 हून अधिक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी मिलींद चौधरी यांनी दिली. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्‍यांना वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक असणार आहे. योजनांच्या आवश्यकतेनुसार पिकांचा तपशिल, कुटुंबाचा तपशील, वीज उपलब्धतता, सिंचन स्त्रोत बाबींचा तपशील सादर करावा लागणार आहे. अर्जदार शेतकर्‍यांनी अर्ज करण्यासाठी महाडिबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर आपला अर्ज दाखल करून वैयक्तिक लाभार्थ्याला हा पर्याय वापरावा लागणार आहे.

परसबागेसाठी  प्रोत्साहन
गावे, वाड्यांतील नागरिकांना घरच्या घरी भाजी पिकवता यावा. यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत परसबाग करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना अनुदानाच्या स्वरूपात 500 रुपये दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याला मंजूरी मिळाल्यानंतर हे अनुदान त्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकर्‍यांना बळकट करण्यासाठी या योजना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशीसंपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

मिलींद चौधरी
कृषी विकास अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version