| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरात प्रवेश करणारे पर्यटक हे स्वच्छता कर भरून प्रवेश करीत असतात. मात्र, त्याच पर्यटक यांना आवश्यक सुविधा अज्ञात माथेरान गिरिस्थान नगरपरिषद कमी पडताना दिसत आहे. माथेरानच्या कपाडिया मार्केटमधील स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी दिली आहे.
माथेरान शहरात जगभरातून पर्यटक येत असतात. पर्यटन हा एकमेव व्यवसाय माथेरानमध्ये असल्याने माथेरान शहरात प्रवेश करणार्या पर्यटक यांच्याकडून माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रवासी आणि स्वच्छता कर घेत असते. त्या बदल्यात प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असते. त्यात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छतागृह तसेच बसण्यासाठी बाकडे, पिण्याचे पाणी आणि अत्यावश्यक गरजेच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अशा प्रकारच्या प्राथमिक सुविधांची जबाबदारी माथेरान पालिकेची आहे. मात्र, पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची देखभाल ठेवली जात नसल्याने त्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली होती. त्यासाठी माथेरान निसर्ग पर्यटन स्टॉल संघटना यांच्याकडून गेली वर्षभर पाठपुरावा सुरु आहे. त्यात शहरातील सर्व प्रेक्षणीय पॉईंट येथील सवच्छतागृहांची दुरुस्ती दिवाळी सणाआधी करण्यात आली आहे.
सध्या माथेरानमधील दिवाळी पर्यटन हंगाम सुरु असून, या महत्त्वाच्या पर्यटन हंगामात माथेरान शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या एमजी रस्त्यावरील कपाडिया मार्केटमधील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले आहे. त्या ठिकाणी पालिका कर्मचारी स्वच्छता राखण्यासाठी जात नाहीत आणि त्यामुळे स्वच्छतागृहाकडे पर्यटक गेल्यावर नाकावर रुमाल ठेवून बाहेर येतात. त्याचवेळी तेथील अस्वच्छता बघून नाराजी व्यक्त करीत आहेत. कपाडिया मार्केटमधील स्वच्छतागृह हे माथेरानमधील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या माधवजी गार्डनच्या बाजूला असून, सर्वाधिक पर्यटक गार्डनमध्ये मनोरंजनासाठी येत असतात. अशा महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने माथेरानकर नाराजी व्यक्त करीत आहेत आणि पालिकेने तात्काळ याप्रकरणी दखल घेऊन स्वच्छता करावी, अशी मागणी माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी केली आहे.