| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागचा गुणकारी आणि औषधी असलेल्या पांढरा कांद्याचे यंदा चांगले उत्पन्न आले असताना होळीला सुरू झालेल्या अवेळी पावसाने कांदा उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढवली आहे. शेतातून काढलेला पांढरा कांदा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला असल्याने सुरू झालेल्या पावसाने आला आहे. पावसामुळे वाचण्यासाठी शेतकर्याची कांदा प्लास्टिकने झाकून ठेवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यास काढलेला तसेच शेतात असलेला कांदा पीक वाया जाण्याचे संकट शेतकर्यांसमोर उभे ठाकले आहे.
रायगड जिल्ह्यात सोमवारी 6 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास होळीला अवेळी पावसाचे आगमन झाले. मंगळवारी धुळीवंदन दिवशी पावसाचे वातावरण निर्माण आहे. अलिबाग तालुक्यातील नेहूली, कार्ले, वाडगाव, वेश्वी, खंडाळे, धोलपाडा, रुळे या भागात पांढरा कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. तर अद्याप काही कांदा शेतात आहे. शेतकर्यांनी काढलेला कांदा हा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला आहे. सुकल्या नंतर त्याच्या माळा तयार करून तो पाठविला जात असतो.
जिल्ह्यात सोमवारपासून अवेळी पावसाने सुरुवात केल्याने कांदा उत्पादक यांची शेतात सुकविण्यासाठी काढून ठेवलेला भिजण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कांदा पावसापासून वाचावा यासाठी शेतकरी त्यावर प्लास्टिक टाकण्यात दंग झाले आहेत. शेतात उभा असलेला कांदाही पावसाने धोक्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.